सराईत दुचाकी चोरटा जेरबंद
News By : Muktagiri Web Team
सातारा : शाहूपुरी, सातारा येथे शाहूपुरी पोलिसांच्या डी. बी. पथकाने चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या सराईत चोरट्याला शिताफीने पकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली. जुबेर शबाब शेख वय 19 रा. शुक्रवार पेठ सातारा, असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर मंदिर दानपेटी फोडून चोरी, एटीएम फोडून चोरी, मोटर सायकल चोरी, चारचाकी चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
याबाबत माहिती अशी, त्याप्रमाणे दि. 28 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेवून पेट्रोलिंग करत असतांना रेकॉर्डवरील एक गुन्हेगार चोरीची स्पलेंडर मोटार सायकल विक्रीसाठी शाहुपूरी चौकाजवळील रॅम्पजवळ येणार आहे, अशी खबर मिळाली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या परिसरात सापळा लावून थांबले. यावेळी रात्री 7.50 वाजण्याच्या सुमारास रेकॉर्डवरील संशयीत काळे रंगाची विना नंबरप्लेटची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल घेवून विक्रीसाठी येताच दबा धरुन बसलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी सदर इसमास मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याने मोटारसायकलबाबत उपयुक्त माहिती दिली नाही. या इसमाकडे गुन्हे प्रकटीकरण शाखेने कसून चौकशी केल्यानंतर त्याने मित्रासह दोन दिवसांपूर्वी मोटारसायकल चोरी करुन विक्रीसाठी आलो असल्याची कबुली दिली. या मोटारसायकलबाबत अधिक माहिती घेतली असता त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असल्याची खात्री झाली.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहा.पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, पो. हेड. कॉ. हसन तडवी, पो.ना.लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो.कॉ.मोहन पवार, पंकज मोहिते, ओंकार यादव यांनी केली.