प्रशासनाने तारल मात्र मातीवाल्यांनी मारलं....
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
वन्यप्राण्यांचा धुडगूस बरा बरा मनुष्य प्राण्याचा विध्वंस नको रे बाबा... माती व्यावसायिकांच्या चोरट्या धंद्याला आवर कोण घालणार? प्रशासन नियमावली बोट ठेऊन तर माती व्यवसाय जीवावर उठलेत. एकानं तर तारलं तर दुसर्या ने मारलं आता करायचे काय अशी गंभीर प्रतिक्रिया नेरळे येथील शेतकर्याने देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माती उपसा आणि नेरळे हे समीकरण गेल्या काही वर्षापासून जिल्हाभर गाजत आहे आणि काही जण ते वाजवून आपल्या झोळ्या भरत आहेत. यामध्ये मरण होत आहे ते शेतकर्याचे. दुदैव असे की याकडे पाहायला कोणाला फुरसत नाही जो तो आपल्या परीने ही गोष्ट नजरेआड करत आहे.
नेरळे येथीर सचिन शिर्के या सुशिक्षित बेरोजगार युवक गेली काही वर्ष शेतीमध्ये निरनिराळे प्रयोग करुन प्रगत तंत्रज्ञानाची साथ घेऊन शेती करत आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्तिंची गुजराण या शेतीवरती करत आहे. मागील वर्षी मातीच्या भरमसाठ उपश्याने वैतागून यांनी शासनदरबारी दाद मागितली होती.
गेल्या काही दिवसापूर्वी या युवा शेतकऱ्यांने आपल्या शेतात कलिंगडाची लागवड केली आहे. रात्र दिवस राबून आपल्या पिकांची काळजी घेतली जात आहे. रात्री च्या सुमारास चोरटी माती वाहतूक व उपसा करणारे बहाद्दर गेल्या दोन दिवसात आपला मोर्चा इकडे वळवून शिर्केच्या शेतानजीकची माती खुदाई करण्यात सुरुवात केली आहे. कलिंगडाची लागवड केलेल्या शेतातून जे सी बी ची वाहतूक माती उत्खनन करण्यात आले आहे. उभ्या मुठभर कोंब फुटलेल्या पिकावरती जे सी बी घालून पिकाचे नुकसान केलेले आहे. शेतमालकाने या माती व्यवसायिकाला कोणतीही परवानगी दिलेली नाही. महसूल विभागाने परवानगी नाकारली आहे. तरी ही चोरटे उद्योग करण्यासाठी हे बहाद्दर पिकाची वाट लावत आहेत हे अन्यायकारक आहे. माती उत्खनन बाबत कितीही बातम्या प्रसारित झाल्या तरीही त्याच रात्री माती उपसा करुन रात्री बारा ते चार या वेळेत माती पळवायची. स्थानिक तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक यांना हे प्रकार माहिती नाही हे अजब गणित आहे. गावातून परवानगी नाही महसूल प्रशासन परवानगी देत नाही तर न देऊदे आम्ही आमचं काम करणार हा उर्मटपणा नेमका का व कोणाच्या कृपाछत्राने? जवळपास बर्याच जनांचे धंदे बंद असताना माती उपसा बंद असताना नेरळे गावातील दंडेलशाही कोणाच्या जोरावरती. रात्री ची गस्त पथके याकडे कानाडोळा का करतात हे गुलदस्त्यातच.
शेतकर्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण?
सचिन शिर्के शेतकर्याच्या पिकांचे झालेले नुकसान पाहता यास जबाबदार कोण? रात्र दिवस शेताची राखण करणे हाच यावरती उपाय आहे का? प्रशासन यावरती काय मार्ग काढणार? वारंवार तक्रारी होऊन ही पाठीशी का व कोणाला घातले जात आहे?