कृष्णा कारखाना निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला
News By : Muktagiri Web Team
कृष्णाकाठच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांनी निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, १८ ते २२ मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ जून असून, २१ जून रोजी मतदान, तर २३ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या घोषणेनंतर कृष्णाकाठी राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरुवात झाली आहे.
सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राज्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रात नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सहकार आणि राजकारणाचा संगम असलेल्या या निवडणुकीत प्रत्येक वेळी बदलणारी समीकरणे आणि गटबाजी राज्यभर लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे यंदाची निवडणूकही तितकीच प्रतिष्ठेची मानली जात आहे.
कारखान्याच्या २०२१ मधील निवडणुकीवेळी सुमारे ४७ हजार १४५ सभासद होते. यंदा मतदारसंख्या वाढून ५० हजार २५२ इतकी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्रत्येक मत निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मागील निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने एकहाती सत्ता राखली होती. त्यांच्याविरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल असे दोन स्वतंत्र गट मैदानात उतरले होते.
त्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी गटांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, जागावाटप आणि नेतृत्वाच्या मुद्द्यावर एकमत न झाल्याने विरोधकांची आघाडी तुटली आणि दोन्ही पॅनेल स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले. अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी संस्थापक पॅनेलला, तर आमदार विश्वजीत कदम यांनी रयत पॅनेलला पाठिंबा दिला होता.
विरोधकांमधील मतविभागणीचा मोठा फायदा सत्ताधारी गटाला झाला आणि जयवंतराव भोसले पॅनेलने २१ पैकी सर्व २१ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधी पॅनेलना एकही जागा जिंकता आली नव्हती.
यंदाही निवडणुकीसाठी सत्ताधारी भोसले गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून, अविनाश मोहिते गटही सक्रिय झाला आहे. मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, आता उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, कृष्णा कारखान्याच्या या निवडणुकीकडे केवळ सातारा-सांगलीच नव्हे तर राज्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्राचेही लक्ष लागले आहे. आगामी काही आठवड्यांत आरोप-प्रत्यारोप, बैठका, राजकीय रणनीती आणि गटबाजीमुळे कृष्णाकाठचे वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


