वाठार, दि.12 : संभाजीनगर येथे 18 व 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघाची निवड चाचणी होणार आहे. ही चाचणी रविवारी (दि. 14) डी.पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव येथे पार पडणार असून राज्यस्तरीय अजिंक्यपदासाठी पात्र जिल्हा संघ निश्चित होणार असल्याची माहिती जिल्हा कुस्तीगार संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे व सरचिटणीस पै. धनंजय पाटील आटकेकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आयोजित या निवड चाचणीद्वारे 17 वर्षाखालील फ्रिस्टाईल (कुमार गट) आणि ग्रीको-रोमन या दोन्ही प्रकारांतील जिल्हा संघ निश्चित केला जाणार आहे. संभाजीनगर येथे 18 व 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक नवोदित मल्ल सज्ज झाले आहेत.
स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूंचा जन्म 2008 किंवा 2009 सालचा असणे आवश्यक असून वजन गट 45kg ते 110kg पर्यंत ठेवले आहेत. वजन मोजणी रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत केली जाईल. दोन कुस्ती मॅट असल्याने स्पर्धेला दुपारी 12 वाजता सुरुवात होऊन सामने एका दिवसात पूर्ण होतील.
कोरेगाव तालुक्यात अशा प्रकारची निवड चाचणी प्रथमच होत असल्याने परिसरातील कुस्तीप्रेमी व वस्ताद मंडळीमध्ये उत्सुकता वाढली आहे.