डॉक्टरवर एकाच वेळी तीन शस्त्रक्रिया; एओटिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट, बायपास शस्त्रक्रिया, यकृत प्रत्यारोपण
News By : कराड | संदीप चेणगे
सह्याद्रि हॉस्पिटल डेक्कन, पुणे येथील मल्टीडिसीप्लिनरी टीमने तीन शस्त्रक्रिया एकाच दिवशी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. यामध्ये एकदाच भूल देऊन एओटिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट (एव्हीआर), बायपास शस्त्रक्रिया (सीएबीजी), त्यानंतर जिवंत दात्याद्वारे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. दीर्घकालीन यकृताचा आजार, यकृताचा कर्करोग आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा विकारांसह अनेक गुंतागुंती असलेल्या 48 वर्षीय पुरुष रुग्णावर या प्रक्रिया करण्यात आल्या. अशा प्रकारे या तिन्ही प्रक्रिया एकाच वेळी करण्यात आल्याची नोंद कोणत्याही अहवालात उपलब्ध नाही. याबाबत सांगताना सह्याद्रि हॉस्पिटलमधील अवयव प्रत्यारोपण व हेपॅटोबिलिअरी शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ.बिपिन विभूते म्हणाले की, आमच्याकडे. ऑक्टोबर २०२२ मध्ये एक 48 वर्षीय व्यक्ती अनेक गुंतागुंतीसह उपचाराकरिता आले.त्यांना एचसीव्ही संसर्गामुळे झालेला दीर्घकालीन यकृताचा आजार होता.त्याबरोबर पोटातील दाब वाढल्यामुळे जलोदर द्रव पदार्थाची गळती आणि त्यामुळे रक्तवाहिन्या फुगून व फुटून झालेला रक्तस्त्राव (जीआय ब्लीड) ही गंभीर स्थिती होती.पेट स्कॅन द्वारे त्यांना यकृताचा कर्करोग असल्याचे निदान झाले आणि याबाबतीत यकृत प्रत्यारोपण हाच एक पर्याय उरला होता. प्रत्यारोपणासाठी ते शारीरिकरित्या पात्र आहेत की नाही याची चाचपणी करत असताना करताना त्यांना हृदयाच्या धमनीचा आणि झडपेचा विकार (एओर्टिक वॉल्व्ह स्टेनॉसिस) असल्याचे निदान झाले. यामुळे प्रत्यारोपण तर सोडूनच द्या कुठलीही शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखीमकारक होते. सह्याद्रि हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ञ डॉ. सुहास हरदास यांच्या मते या रुग्णाला महाधमनीच्या झडपेचा जन्मजात विकार (कॉजिनेंटल स्टेनोसिस ऑफ एओटिक वॉल्व्ह) होता.त्यामुळे प्रत्यारोपण करण्याआधी हृदयाशी निगडीत समस्यांचे निदान करणे गरजेचे होते, कारण हे प्रत्यारोपणादरम्यान जोखीमकारक ठरू शकले असते. या परिस्थितीमध्ये प्रत्यारोपणाआधी झडप बदलणे गरजेचे होते. सहयाद्रि हॉस्पिटल येथील कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. संदीप तडस म्हणाले की, रुग्णाला महाधमनीचा विकार होता आणि अँजिओग्राफीचा सल्ला दिला गेला. उजव्या रक्तवाहिनीमध्ये 75 टक्के अडथळा (ब्लॉकेज) होता.डॉ. विभूते म्हणाले की, एओटिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट आणि बायपास शस्त्रक्रिया पहिले करून मग 6 ते 12 आठवड्यानंतर प्रत्यारोपण करणे हा एक पर्याय होता. मात्र यात जोखीम होती. पण यापेक्षा जास्त जोखीम ही यकृत प्रत्यारोपणासाठी थांबणे किंवा विलंब करणे ही होती, कारण तोपर्यंत यकृतातील ट्युमरचा आकार वाढला असता आणि शस्त्रक्रिया करणे शक्य झाले नसते. त्यामुळे आम्ही विविध विभागांबरोबर बैठक घेतली आणि एक वेगळा दृष्टीकोन माडला, एकाच वेळी तीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. एकदाच भूल देऊन एओटिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट, बायपास शस्त्रक्रिया, जिवंत दात्याकडून यकृत प्रत्यारोपण करण्याचे ठरविले. डॉक्टरांची डॉ.विभूते म्हणाले की,एकाच वेळेस अनेक प्रक्रिया करणे हे अत्यंत जोखमीचे व आव्हानात्मक असते. त्यासाठी अनुभवी बहुआयामी टीम,अत्याधुनिक सोयी-सुविधा महत्त्वाच्या असतात.जी गोष्ट अशक्य वाटत होती ती बहुआयामी दृष्टीकोन,रुग्णाच्या शारीरिक परिस्थितीचा अचूक आढावा, अशा प्रक्रिया पार पाडण्याची टीमच्या क्षमतेची समज, उपलब्ध सोयी आणि योग्य नियोजन या सर्व गोष्टींद्वारे शक्य झाले. सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त संचालक अबरार अली दलाल म्हणाले की, आमच्या या टीमची कामगिरी प्रशंसनीय आहे, कारण यामुळे अशा गुंतागुंतीच्या स्थितीत असलेल्या रुग्णांना एक नवी आशा निर्माण होते. याचबरोबर आपल्या पतीला यकृत दान करणाऱ्या त्यांच्या पत्नीला सलाम. जेणे करून त्यांना एक नवजीवन प्राप्त झाले. पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांपर्यंत पोहचून त्यांना उपचार सहजरित्या उपलब्ध व्हावेत या दृष्टीने सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण येथे सह्याद्रि हॉस्पिटल्स तर्फे लिव्हर ओपीडी नियमितपणे चालवल्या जातात. त्याशिवाय कराड आणि कोल्हापूर येथे लहान मुलांमधील यकृत आजारांसंदर्भात ओपीडी सुरु आहेत