डांबर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक
News By : Muktagiri Web Team

मुक्तागिरी वृत्तसेवा
कराड, ः सुर्ली ता. कराड येथे डांबर चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन लाख रूपये किमतीचे चार टन डांबर व 15 लाख रूपये किमतीचा टँकर असा एकूण 17 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
राजेश जसवंत सिंग (वय 40), विजयपाल उमेद सिंग (वय 29, दोघेही रा. रा. भुटोली, ता. निमकथाना, जि. सिक्कर, राजस्थान), प्रतिक अशोक बोरकर (वय 25 रा. एकोडी, ता. वारासोणी, जि. बालाघाट, मध्यप्र्रदेश) व आदम दादाहयात (शेख 42, रा. चेबूर मुंबई), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुर्ली ता. कराड गावच्या हद्दीतील लिनोफ डांबर बॅचमिक्स कंपनीच्या डांबर प्लॅन्टमधून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राजस्थान व मध्यप्रदेश येथील कामगार डांबराची चोरी करत असताना वॉचमनला दिसले. वॉचमनने आरडाओरडा केल्याने त्या कामगारांनी दोन लाख रूपये किमतीचे चार टन डांबर व टँकर असा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत उदय धनाजीराव जाधव (रा. सैदापूर, ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की चोरी करणारे परप्रांतीय कामगार हे बॅगा घेऊन त्यांचे मूळ गावी पळूण जाण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सुर्ली भागात सापळा रचून तेथून राजेश सिंग, विजयपाल सिंग, प्रतिक बोरकर या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता चोरलेले डांबर हे आदम शेख हा टँकरमधून मुंबईकडे घेऊन गेला असल्याची माहिती मिळाली. त्याला पोलिसांनी चेंबूर येथून अटक केली. त्याच्याकडे चोरून नेलेले दोन लाख रूपये किमतीचे चार टन डांबर व 15 लाख रूपये किमतीचा टँकर असा एकूण 17 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अधिक तपास पोलीस हवालदार सचिन निकम करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत चौधरी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, किरण बामणे, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे, सुजीत दाभाडे, संजय जाधव यांनी केली.