सातारा जिल्ह्यात उंब्रज पोलीस ठाणे ठरले बेस्ट
News By : उंब्रज । महेश सुर्यवंशी

सातारा जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कामगिरीची आढावा घेऊन ज्या पोलीस ठाण्याने चांगली कामगिरी केली आहे त्यांना प - शस्तीपत्रक देऊन त्यांचे मनोबल उंचावले जाते. सातारा जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांच्या उपस्थितीत सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीच्या बैठकीत उंब्रज पोलीस ठाण्याला 'बेस्ट पोलीस स्टेशन इन कनव्हिक्शन रेट' ने सन्मानित करण्यात आले.
जिल्हापोलीस प्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर यांच्या उपस्थितीत उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस हवालदार संजय धुमाळ,पोलीस कॉन्स्टेबल टी. एच. कार्वेकर, पी. आर. पाटील , राजू कोळी यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. भोरे यांनी उंब्रज पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारल्यापासून त्यांनी प्रत्येक गुन्ह्याची फाईल स्वतः लक्ष घालून गुन्हेगाराला न्यायालयात शिक्षा कशी होईल या पद्धतीने तयार करण्यात गुंतवून घेतले. गुन्हेगारांवर वचक ठेवताना भोरे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तडीपारीसह त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यातील प्रत्येक बीट अंमलदार यांच्यात समन्वय ठेवून अवैध व्यावसायिकांसह गुन्हेगारांनी डोके वर काढता कामा नये याचा आराखडा त्यांनी तयार केला. हे करत असतानाच अजामिनपात्र वॉरंट बजावण्यातही उंब्रज पोलीस ठाणे आघाडीवर राहिले. सामान्य नागरिकांशी संवाद साधत त्यांच्याकडून गोपनीय माहिती घेऊन उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकदा छापासत्र, कोम्बिंग ऑपरेशन राबवले गेले. याचीच दखल जिल्हा पोलीस प्रमूख समीर शेख यांनी घेतली. त्यानुसार त्यांनी उंब्रज पोलीस ठाण्याच्या कामगिरीच्या अहवालास प्रथम प्राधान्य देत अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यासंदर्भात बोलताना रविंद्र भोरे म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राबवताना सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्याही गुन्हेगाराचा, अवैध व्यावसायिकाचा सामान्य नागरिक, महिला, मुलींना त्रास झाला नाही पाहिजे याला आम्ही प्राधान्य देत आहोत. उंब्रजच्या नागरिकांनीही आम्हाला अपेक्षित सहकार्य केले असून अजामिनपात्र वॉरंट बजावून त्याच्या अमलबजावणीतही ठाणे अग्रेसर राहिले. जिल्हापोलीस प्रमुखांकडून मिळालेली शाब्बासकी आमचे मनोबल निश्चितपणे उंचावेल.