गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून सहा घरफोडींची उकल कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने चालू महिन्यातील कामगिरी पाहता एकूण 27.1 तोळे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्त करून सहा घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मुक्तागिरी वृत्तसेवा
कराड, दि. 14 ः कराड शहर परिसरातील मलकापूर, कोयना वसाहत, कार्वेनाका येथे झालेल्या घरफोडीतील संशयितास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे पंधरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश असून तिला समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यशवंत प्रकाश काटवटे (रा. आगाशिवनगर झोपडपट्टी, मलकापूर, ता. कराड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर परिसरात फेब्रुवारी ते जुलै महिन्याच्या दरम्यान मलकापूर, कोयनावसाहत, कार्वेनाका परिसरात जबरी घरफोडी झाल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अशोक भापकर व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर घरफोडीमधील संशयित यशवंत काटवटे याला मलकापूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याची अल्पवयीन मुलीसोबत मिळून घरफाड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी यशवंत काटवटे याला अटक केली असून त्याने चोरी केलेला 14 लाख 80 हजार रूपये किमतीचे 18.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीस समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यशवंत काटवटे याच्याकडे पोलिसांचा कसून तपास सुरू असून त्याच्याकडून अजून गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसानी वर्तवली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, श्रद्धा आंबले, तब्बसुम शादीवान, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, निखील मगदूम, पोलीस हवालदार संदीप कुंभार, संतोष पाडळे, सज्जन जगताप, अनिल स्वामी, धिरज कोरडे, संग्राम पाटील, आनंदा जाधव, अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमीन, मुकेश मोरे, प्रशांत वाघमारे, महेश पवार, सोनाली पिसाळ, यांनी केली.