रक्तदाब स्थिर ठेवणाऱ्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री उघड — एकास अटक
ठाणे, वागळे इस्टेट : रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी वापरले जाणारे आणि मानवी शरीरास अपायकारक असलेल्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या औषधाची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव मंगेश सदानंद परब (३२ वर्षे, व्यवसाय – जिम ट्रेनर, रा.
वागळे
इस्टेट) असे आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनंतर व ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पोलिसांनी सापळा रचून २९ जुलै रोजी, सायंकाळी ७:१५ वाजता वाघळे इस्टेट येथील सौरसिटी येथे कारवाई केली. त्या ठिकाणी मंगेश परब हा औषधाचे २२० बॉटल्स बेकायदेशीरपणे विक्रीसाठी घेऊन थांबलेला होता.
सदर औषधाची किंमत १,०४,६४८/- रुपये इतकी असून, हे औषध डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्याविना विक्रीस निषिद्ध आहे.
औषध विक्रीचा परवाना नसतानाही आरोपीने ते औषध मिळवून आर्थिक फायद्यासाठी वापराचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक १८६/२०२५, भादंवि कलम १८८, २७४, २७५, तसेच औषध कायदा १९५४ चे कलम १८ (क) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू असून, अधिक साठा व पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.