सह्याद्रि साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट
टेस्टींग करत असताना घडली दुर्घटना ः तीन ते चार कर्मचारी भाजल्याने गंभीर जखमी
Published:Mar 20, 2025 11:37 AM | Updated:Mar 20, 2025 11:37 AM
News By : Muktagiri Web Team
कराड ः यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना स्फोट झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या भाजल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
शैलेश भारती (वय 32 रा. उत्तर प्रदेश), अमित कुमार (वय 19 रा. बिहार), धर्मपाल (वय 19 रा.उत्तर प्रदेश ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
यशवंतनगर येथे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात ऊसाचे गाळप सुरू आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी ईएसपी बॉयलर कारखान्यात बसविण्यात आला आहे. त्याचे आठ दिवसापासून टेस्टींग सुरू आहे. गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारासही टेस्टींग सुरू असताना तेथे मोठा स्फोट झाला. त्या दुर्घटनेत टेस्टींगचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.