संत निरंकारी मिशनच्यावतीने स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान
News By : Muktagiri Web Team

कराड : परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने रविवारी (ता. २३) स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली ज्यामध्ये 'अमृत प्रोजेक्ट' अंतर्गत 'स्वच्छ जल, स्वच्छ मन' अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले.
या अभियाना अंतर्गत कराड मधील कृष्णा कोयना प्रीती संगम नदी पात्र परिसर व घाट या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये कराड, ढेबेवाडी, व नांदगाव या ठिकाणाहून पाचशेहून अधिक निरंकारी सेवादल, स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला अशी माहिती मिशनचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी दिली.
या स्वच्छता अभियान दरम्यान विधान परिषदेचे माजी आमदार श्री आनंदराव पाटील (नाना) यांनी भेट दिली. संत निरंकारी मिशनमार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाला शुभेच्छा व अभियानाचे कौतुक करून
म्हणाले की"संत निरंकारी मिशनच्या अमृत अभियानांतर्गत 'स्वच्छ जल स्वच्छ मन' हा उपक्रम हाती घेतला हे उल्लेखनीय आहे. या उपक्रमांतर्गत आज कराड मधील प्रीतीसंगम घाटावरती व नदीकाठी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात पाण्याबाबत प्रचंड जनजागृती होणं गरजेचे आहे. त्यासाठी 'स्वच्छ जल स्वच्छ मन' यासारख्या उपक्रमांची गरज असून यामध्ये अधिकाधिक नागरीकांनी सहभागी व्हावं" असे आवाहन श्री आनंदराव पाटील यांनी केले.
संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण प्रभारी जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात राबविलेल्या 'अमृत प्रोजेक्ट' परियोजनेच्या दरम्यान सर्व सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. युवावर्गाचा विशेष सहभाग हा अभियानाचा मुख्य आधार होता. त्यांनी हेही सूचित केले, की ही मोहीम केवळ एका दिवसापुरती सीमित नाही तर दरमहा विविध घाट व जलस्रोतांची स्वच्छता निरंतर चालू राहील. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने, पूज्य बाबा हरदेवसिंहजी यांच्या असंख्य दिव्य शिकवणूकींतून प्रेरणा घेत या पावन अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कराड नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.