पाटण विधानसभा मतदारसंघात ७ अर्जांची माघार निवडणूक रणांगणात ११ उमेदवार
News By : Muktagiri Web Team
पाटण/प्रतिनिधी
२६१ पाटण विधानसभा मतदारसंघात छाननी नंतर १८ उमेदवारांची संख्या निवडणूक प्रक्रियेत होती. त्यापैकी ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूकीस ११ उमेदवार सामोरे जाणार आहेत अशी माहिती सोपान टोंपे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
उमेदवारी अर्जांची छाननी पार पडल्यानंतर दि. ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्जांची माघार व त्यानंतर चिन्ह वाटप करण्यात आले.
अर्ज माघार प्रक्रियेत, भाजपचे सक्रिय पदाधिकारी दिपक महाडिक यांनी अपक्ष अर्ज भरला होता तो माघारी घेण्यात आला. यशस्विनीदेवी सत्यजितसिंह पाटणकर, चंद्रशेखर शामू कांबळे, धस प्रकाश तानाजी, सयाजीराव दामोदर खामकर, सचिन नानासो कांबळे, सर्जेराव शंकर कांबळे या उमेदवारांनी वैधपणे आपली उमेदवारी मागे घेतली.
यानंतर प्रयत्न निवडणूक रणांगणात अकरा उमेदवार यांना चिन्ह वाटप करण्यात आले. उमेदवारांनी नमूद केलेल्या पक्षांचा व मागणी केलेल्या चिन्हे त्यांना देण्यात आली. यांचा प्राधान्य क्रम राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यता प्राप्त पक्षाचे उमेदवार व अन्य अपक्ष उमेदवार यांना चिन्ह देण्यात आले.
भानूप्रताप मोहनराव कदम (शिवसेना उबाठा गट चिन्ह-मशाल), महेश दिलीप चव्हाण (बहुजन समाज पार्टी चिन्ह-हत्ती), शंभूराज शिवाजीराव देसाई (शिवसेना चिन्ह-धनुष्यबाण), बाळासो रामचंद्र जगताप (वंचित बहुजन आघाडी चिन्ह- गँस सिलेंडर), विकास पांडुरंग कांबळे (रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया ए चिन्ह- शिवण यंत्र), विकास संभाजी कदम (राष्ट्रीय समाज पक्ष चिन्ह- शिट्टी), प्रताप किसन मस्कर (अपक्ष चिन्ह- बँट), विजय जयसिंग पाटणकर (अपक्ष चिन्ह- प्रेशर कुकर), सत्यजितसिंह विक्रमसिंह पाटणकर (अपक्ष चिन्ह- आँटो रिक्षा), सूरज उत्तम पाटणकर (अपक्ष चिन्ह- ट्रम्पेट), संतोष रघुनाथ यादव (अपक्ष चिन्ह- ट्रक) वाटप करण्यात आले आहे.
सोमवारी दिवसभर उपविभागीय कार्यालय परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, पोलिस निरीक्षक कवटेकर अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा पोलिस फौजफाटा तैनात होता. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे व तहसीलदार अनंत गुरव यांनी काम केले.