मध्य रेल्वेच्या १३ कर्मचाऱ्यांचा संभाव्य अपघात टाळल्याबद्दल आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्काराने सन्मान.
News By : विजय भोसले

मुंबई: मध्य रेल्वेने आपल्या १३ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल आणि सतर्कतेबद्दल 'महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार' (सेफ्टी अवॉर्ड) देऊन सन्मानित केले आहे. महाव्यवस्थापक श्री. धरम वीर मीना यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांमध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, आणि रु २०००/- रोख बक्षीस यांचा समावेश आहे. मुंबई, नागपूर, सोलापूर, पुणे आणि भुसावळ विभागातील या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य रेल्वे अपघात टाळले, ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित झाली.
या पुरस्कार विजेत्यांमध्ये मुंबई विभागातून १, नागपूरमधून ४, सोलापूर व पुणे विभागातून प्रत्येकी ३ आणि भुसावळ विभागातून २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लोणावळा येथील ट्रॅक मेंटेनर श्री. महावीर मीणा यांनी रुळावर पडलेले झाड पाहून तातडीने ट्रेन थांबवली. नागपूर विभागातील ट्रेन मॅनेजर श्री. चंदू सातपुते यांनी ट्रेनखाली अडकलेला २० फुटांचा पाईप वेळीच काढला. स्टेशन मॅनेजर श्री. प्रदीप कुमार यांनी मालगाडीतील ठिणग्या पाहून पुढील स्टेशनला माहिती दिली. बैतूल येथील हेड कॉन्स्टेबल श्री. सत्यप्रकाश राजूरकर यांनी धावत्या ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचवला. या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठे अपघात टळले आहेत. पुणे विभागातील स्टेशन मॅनेजर श्री. मधुसूदन बाळा, वातानुकूलित मेंटेनर श्री. सूरज लांजेवार आणि ट्रॅक मेंटेनर श्री. महेश तलवार यांनीही आपल्या सतर्कतेतून अनुचित घटना टाळल्या. सोलापूर विभागातील श्री. लिंगराज कांदे, श्री. ललित कुमार, श्री. शुभम भोयार तसेच भुसावळ विभागातील लोको पायलट श्री. प्रदीप बारडे आणि ट्रॅक मेंटेनर श्री. मंगेश रामटेके यांनीही अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
पुरस्कार प्रदान करताना महाव्यवस्थापक श्री. मीना यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि अशा कृतींमुळे इतरांनाही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे सांगितले. याप्रसंगी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री पटली असून, रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.