घरफोडी आणि चोरी प्रकरणात गुन्हेगार अटकेत
भिवंडी – नारपोली पोलीस ठाण्याच्या पथकाने भिवंडी परिसरातील घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये गुंतलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या आरोपीकडून तब्बल ९ गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला असून पोलिसांनी १८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख मिळून एकूण ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नारपोली पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९९/२०२४ भा.दं.वि. कलम ३०९ (३१), ३३९ (३) या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी आकाश शिवाजी शिताप याला पकडण्यात आले. प्राथमिक चौकशीत आरोपीने विविध ठिकाणी घडवलेल्या घरफोडी आणि चोरीच्या ९ गुन्ह्यांची कबुली दिली.
या गुन्ह्यांमध्ये नारपोली, कोन, भिवंडी तालुका आणि कळवा पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ५९९/२०२४, ५७४/२०२४, ५५८/२०२४, ५५१/२०२४, ५३०/२०२४, ३००/२०२४ (नारपोली), ११३९/२०२४ (भिवंडी तालुका), २२२/२०२४ (कोन), आणि ३०२/२०२४ (कळवा) असे एकूण ९ गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले.
ही कारवाई डीसीपी डॉ. श्री. पंढरिनाथ उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पोलीस दलाच्या या जलद कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. चोरीच्या गुन्ह्यांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास सुरू आहे.