कराड : – कराड शहरातील कार्वे नाका परिसरातील पोस्टल कॉलनीत सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री कराड शहर पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत माजी नगरसेवक गजेंद्र खाशाबा कांबळे यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एका संशयिताने पलायन केल्याची माहिती आहे. पोलिसांनी एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भापकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी सात जण 'तीनपानी' नावाचा जुगार खेळताना आढळले.
ताब्यात घेतलेले संशयित पुढीलप्रमाणे आहेत –
अली हुसेन बिलाल पटेल (वय 28, बुधवार पेठ)
शाहरुख शकील संदे (वय 29, मंगळवार पेठ)
युसुफ मुसा सुतार (वय 30, मंगळवार पेठ)
इरफान अश्रफ कच्छी (वय 23, मंगळवार पेठ)
नईम युनस शेख (वय 29, मंगळवार पेठ)
गजेंद्र खाशाबा कांबळे (वय 52, बुधवार पेठ), माजी नगरसेवक
तर प्रथमेश मोरे नावाचा संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. सर्व जण कराड शहरातीलच असून बेकायदेशीरपणे जुगार खेळत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन्स, दुचाकी आणि चारचाकी वाहने असा एकूण १ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईमुळे कराड शहरात खळबळ उडाली असून, माजी नगरसेवक गुन्ह्यात अडकल्यामुळे राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.