ड्रग्ज प्रकरणात कराडच्या बड्या व्यवसायिकाच्या मुलगा
News By : Muktagiri Web Team

कराड शहर व परिसरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर डीवायएसपी कार्यालयाच्या पथकाने मागील महिन्यात कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 37 ग्रॅम ड्रग्जसह सुमारे तेरा जणांना अटक केली होती. यामध्ये दोन परदेशींचा समावेश होता. तेव्हांपासून या प्रकरणातील कराडातील मोठ्या व्यावसायिकांचा समावेश असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. आता या प्रकरणामध्ये ‘चांदी'चा चमच्याने जेवण करण्याचे स्वप्न बघणाऱ्या व पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या दारू व्यावसायिकाच्या मुलासह आणखी एकाचा सहभाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गेल्या महिन्यापूर्वी कराड शहर व परिसरामध्येही पोलिसांनी ओगलेवाडी येथे छापा टाकून (एमडी) ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना अटक केली होती. त्याचे धागेदोरे सुरूवातीला मुंबई त्यानंतर परदेशापर्यंत पोहचले होते. या प्रकरणी पोलिस तपास सुरू होता. आता या ड्रग्ज प्रकरणात पश्चिम महाराष्ट्रातील बड्या दारू व्यावसायिकाच्या मुलाचा सहभाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी अटक केलेल्या संशयितांबरोबर या व्यावसायिकाच्या मुलाचे कॉल रेकॉडींग पोलिसांना मिळून आल्याचेही सांगण्यात आले आहे. फोन कॉलमधून काही धक्कादायक माहिती पोलिसांना समजली असल्याने व या ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या दारू व्यावसायिकाच्या मुलाला ताब्यात घेण्याच्या हालचाली केल्या. त्यानुसार पोलिसांचे एक पथक संबंधिताला ताब्यात घेण्यासाठी दारू दुकानावर गेले असता तो तेथे मिळून आला नाही. पोलिसांना ड्रग्ज प्रकरणात आपला सहभाग असल्याचा संशय आल्याने पोलिस आपल्यावर कारवाई करण्यासाठी येत असल्याचे समजल्यानंतर त्याने तेथून पोबारा केला. त्यामुळे दारू व्यवसायिकाच्या मुलाने पोलिसांना चकवा दिला असला तरी पोलिस त्याच्या मागावर आहेत. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. त्याचा आणखी एक साथीदारही यामध्ये असल्याने पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.
दारू व्यवसायिकाच्या मुलाचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याचे माहिती पुढे आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग असणार आहे हे संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरच समजणार आहे. त्यामुळे पोलिसांना दारू व्यवसायिकाचा मुलगा सापडल्यानंतर आणखीही बड्या धेंड्याची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.