जिल्हा हादरला : तब्बल सहा कोटींचे कोकेन जप्त
News By : Muktagiri Web Team

कराड ः कराड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीमध्ये खते तयार करणाऱ्या कंपनीच्या आडून कोकेनसारख्या घातक अमली पदार्थांचा साठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कराड डीवायएसपी कार्यालय व तळबीड पोलिसांनी अत्यंत गोपनीयपणे केलेल्या कारवाईत ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन' या कंपनीमधून तब्बल 1270 ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्याने किंमत सुमारे 6 कोटी 35 लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख (रा. नांदगाव), समीर सुधाकर पडवळ (रा. वृंदावन सिटी मलकापूर कराड), रमेश शंकर पाटील (रा. मल्हारपेठ ता. पाटण), जीवन चंद्रकांत चव्हाण (रा. आवार्डे ता. पाटण), विश्वनाथ शिपणकर (रा. दौंड जिल्हा पुणे) यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तासवडे एमआयडीसीमधील बी-56 ब्लॉकमध्ये ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन' ही कंपनी आहे. ही कंपनी शेतीसाठी खते तयार करते, असा मुखवटा वापरून तिथे अवैधपणे कोकेनचा साठा केला जात होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांनी तातडीने नियोजनबद्ध कारवाई केली आणि कंपनीवर छापा टाकला. यावेळी अति सावधगिरीने परिसराची झडती घेण्यात आली. छाप्यात पांढऱ्या रंगाच्या पावडरच्या स्वरूपात 1270 ग्रॅम कोकेन मिळून आलं, जे तांत्रिक चाचणीद्वारे कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईनंतर पोलिसांनी कंपनीतील संबंधित पाच जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हे कोकेन कुठून आणले गेले, कोणत्या मार्गाने आणि कोणत्या हेतूने येथे साठवले गेले, याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
पोलिसांना हातात सापडलेल्या पुराव्यांवरून हे कोकेन विक्रीसाठी बाळगण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.