घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा
कराड, : मलकापूर-आगाशिवनगर येथे घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील मिरज येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून अकरा लाख 16 हजार रुपये किमतीचे साडे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
परशुराम बुटाप्पा ओलेकर (रा. शिंदगी ता. जि. विजापूर, राज्य कर्नाटक) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील महिन्याभरापूर्वी आगाशिवनगर येथील आयोध्या नगरीतील लोक वस्तीमध्ये व शास्त्रीनगर मलकापूर येथे घरफोडीचा प्रकार झाला होता. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या टीमला सदर घटनेचा तपास करून संशयित आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अशोक भापकर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्ह्यातील संशयितास सांगली जिल्ह्यातील मिरज येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास केला असता परशुराम ओलेकर याने मलकापूर व आगाशिवनगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले अकरा लाख 16 हजार रुपये किमतीचे साडे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, पोलीस उपनिरीक्षक भंडारे, निखिल मगदूम, पोलीस हवालदार शशि काळे, अमित पवार, अशोक वाडकर, अनिल स्वामी, कुलदीप कोळी, संदीप कुंभार, अमोल देशमुख, मोहसीन मोमीन, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, हर्षल सुखदेव, आनंदा जाधव, मुकेश मोरे, प्रशांत वाघमारे, सपना साळुंखे, सोनाली पिसाळ यांनी केली.