पाहिल्याच मॅचला बुकी कंगाल, खेळणारी मालामाल आयपीएल 2025 चा सीझन शनिवारपासून सुरू झाला. पहिली मॅच कोलकत्ता विरूद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर असा सामना रंगला. यामध्ये अगदी टॉस उडवण्यापासून सट्टा लागला होता. ते अगदी बेस्ट बॅटसमन, बेस्ट बॉलर, बेस्ट किपर ते अगदी लास्ट ओव्हरपर्यंत मोठ्या प्रमाणात सट्टा लागला होता. यामध्ये सट्टा लावणारी मालामाल झाली. मात्र, बुकी कंगाल झाल्याची चर्चा दिवसभर कराडात रंगली होती.
कराड : आयपीएल सुरू होण्याच्या अगोदर आठ दिवसापासून कराडात बुकींचा सुळसुळाट झाला आहे. कराडातील बुकींनी कराड शहरानजीकच्या प्रतिष्ठीत हॉटेलमध्ये आपल्या रूम बुक केल्या आहेत. जेणेकरून त्या हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकू नये. कराड शहर व परिसरात सध्याच्या घडीला 29 बुकी आयपीएलचा सट्टा घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये काही प्रतिष्ठीत नागरिक तर अनेकजण रेकॉर्डवरील गुन्हेगारही असल्याचे दिसत आहे. हे सर्व सुरू असताना स्थानिक पोलिसांनी मात्र, प्रत्येक बुकीला महिना 60 हजार रूपये द्यावे लागतील असा फंडा काढल्याची चर्चा सुरू आहे. नाहीतर धंदा बंद करावा लागेल असा सज्जड दम देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या सट्टा घेणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा कराडचा बीड व्हायला वेळ लागणार नाही.
दैनिक मुक्तागिरीने आयपीएलच्या पहिल्या दिवशीच करोडोंची उलाढाल झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतरही डीवायएसपी कार्यालय, शहर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडून हाताची घडी तोंडावर बोट ठेवत त्याकडे कानाडोळा केला जात आहे. कराड शहरात सध्याच्या घडीला सोमवार पेठेत एक बुकी, मंगळवार पेठेत चार बुकी, बुधवार पेठेत सहा बुकी, गुरूवार पेठेत पाच बुकी, शुक्रवार पेठेत तीन बुकी, शनिवार पेठेत एक बुकी, मलकापूर परिसरात दोन बुकी, वाखाण परिसरात एक बुकी, कार्वे नाका परिसरात एक बुकी, बैलबाजार परिसरात एक बुकी, कृष्णा कॅनॉल परिसरात एक बुकी, गजानन हौसिंग सोसायटी परिसरात एक बुकी तर ग्रामीण भागातील वडगाव हवेली, वहागाव परिसरात एक एक बुकी या आयपीएलचा सट्टा घेत आहेत.
कराड शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. ते सर्व पोलिसांच्या कृपादृष्टीनेच सुरू असल्याचे सर्वसामान्य नागरिकांना माहित आहे. कोणताही एखादा अवैध व्यवसाय सुरू करायचा असेल तर सुरूवातीपासूनच पोलिस स्टेशन येऊन सेटलमेंट करावी लागते. त्यासाठी पोलिसांनी त्यांची काही खास माणसे नेमली आहेत. त्यामध्ये त्यांचा हातकंडा आहे. आयपीएल सुरू होण्याच्या अगोदरपासूनच कराड शहर पोलीस ठाणे आणि डीवायएसपी कार्यालय येथे बुकी घेणाऱ्यांची रहदारी सुरू झाली होती. ते अनेकदा दिसून आले आहे. यामध्ये काही राजकीय पदाधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. कराड शहर व परिसरात सध्याच्या घडीला जरी 29 बुकी असली तरी अजून यामध्ये बुकींची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
सर्वात जास्त बुकींची संख्या ही कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. काही बुकीवाल्यांकडून पोलीस मॅनेज केल्याचे बोलले जात आहे. तर काहीजण चोरी-छुपे सट्टा घेत आहेत. कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे बऱ्यापैकी अवैध धंदे करणाऱ्यांची यादी असते. मात्र, आयपीएल सट्टा घेणाऱ्यांची नावे त्यांना कशी काय समजू शकत नाही हे आश्चर्यकारक आहे. का नावे समजूनही त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. जर स्थानिक पोलीस या सट्टा बाजाराकडे दुर्लक्ष करीत असतील तर वरिष्ठांनी याकडे लक्ष्य देऊन कराडचा बीड होण्यापासून कराडला वाचवावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.