कराड - विद्यानगर येथे जमावाचा हॉटेलवर हल्ला
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि.10 : दारू न दिल्याचा राग मनात धरून जमावाने हॉटेलवर हल्ला केला. यामध्ये जमावाने दगडफेक करत लाकडी दांडके सायलेन्सर व बाटल्यांनी हाॅटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. कराड-विटा रस्त्यावरील सैदापूर-विद्यानगर (ता. कराड) गावच्या हद्दीतील कृष्णा कॅनॉल जवळील हॉटेल हर्ष एक्झिक्युटिव्हमध्ये शनिवार दिनांक 10 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असून संशयितांची माहिती घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की कृष्णा कॅनॉल जवळील हॉटेल हर्ष एक्झिक्युटिव्हमध्ये विद्यानगरमधीलच एक जण शनिवारी दुपारी गेला होता. त्यावेळी त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडे दारूची उधारीवर मागणी केली. त्यावेळी तेथील हॉटेल कर्मचाऱ्यांने उधारीवर दारू देण्यास नकार दिला. त्यामुळे दुपारी त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर हॉटेलमधील काही जणांनी उधारीवर दारू मागणाऱ्या युवकाला मारहाण करून तेथून हाकलून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर संबंधित युवक रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुमारे पंधरा जणांचा जमाव घेऊन पुन्हा हॉटेल हर्ष एक्झिक्युटमध्ये गेला. तेथे त्यांने पुन्हा उधारीवर दारू देण्याची मागणी केली. मात्र हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी नकार देताच जमावाने हॉटेलवर हल्ला केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करत लाकडी दांडके सायलेन्सर तसेच बाटल्यांनी हॉटेलची तोडफोड केली. यामध्ये हॉटेलच्या काचा फोडल्या असून इतर साहित्यासह फलकाचेही नुकसान केले आहे. त्यानंतर जमाव तेथून पांगला. हॉटेलवर जमावाने हल्ला केल्याची माहिती मिळताच कराड गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस उपनिरीक्षक चोरगे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच हल्ला केलेल्या जमावामध्ये कोण कोण होतं याचीही माहिती घेण्यास सुरुवात केली असून या घटनेची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.