‘कृष्णा’कडून झाडांसाठी विशेष पाणीपुरवठा आगाशिव टेकडी जमिनीपासून सुमारे ३०० फूट उंच आहे. याठिकाणी वृक्षसंवर्धन करायचे झाल्यास झाडांना नियमित पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कृष्णा विश्व विद्यापीठाने झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. याचबरोबर विद्यापीठातील स्वयंसेवक व या कामासाठी विशेष नियुक्त केलेले कर्मचारी झाडांना नियमित पाणी व खते घालणे, तसेच त्यांचा वन्यप्राण्यांपासून व वणव्यापासून बचाव करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
कराड : ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या प्रभावामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, या सामाजिक जाणिवेतून कृष्णा विश्व विद्यापीठाने गेल्या ५ वर्षांपासून ‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगाशिव टेकडीवर आत्तापर्यंत ३००० हून अधिक देशी झाडांचे रोपण व संवर्धन करण्यात आले असून, यामुळे टेकडीचा परिसर हिरवागार बनणार आहे. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या भूमिकेतून विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अनेक उपक्रम राबविले जातात. विद्यापीठाने विविध पर्यावरण संवर्धक उपक्रम राबविण्यासाठी कृष्णा ग्रीन ब्रिगेडची स्थापना केली असून, या ग्रीन ब्रिगेडच्या माध्यमातून समाजात पर्यावरणविषयक जागृती निर्माण केली जाते. कृष्णा विश्व विद्यापीठाने सन २०१९ साली महाराष्ट्र राज्य शासनाच्या वनविभागाशी करार करत, कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पांतर्गंत आगाशिव डोंगरावर रोपांची लागण, संगोपन आणि संवर्धनाचे शिवधनुष्य विद्यापीठाने हाती घेतले आहे. गेल्या ५ वर्षात विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत; सुमारे ३००० हून अधिक जंगली, देशी झाडांची लागवड करुन, त्यांचे संगोपन केले आहे. या झाडांची चांगली वाढ झाल्याने आगाशिव टेकडी परिसर हिरवागार बनणार आहे. कराड येथील निसर्ग ग्रुपच्या सदस्यांच्या हस्ते आणि सातारा जिल्हा वनसंरक्षक आदिती भारद्वाज, कुलपती डॉ. सुरेश भोसले व माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच आगाशिव डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध देशी रोपांची लागवड करण्यात आली. या कामात कृष्णा विश्व विद्यापीठाच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एन.सी.सी.) च्या विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले. याप्रसंगी मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिव अर्चना कौलगेकर, प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते, डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. शशिकिरण, सौ. रोहिणी बाबर यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.