सातारा जिल्ह्यातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी वजा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी वजा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकार्यांशी संपर्क होत नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्याशी संपर्क साधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आवश्यक त्या सूचना केल्या असून, जिल्ह्याला ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही आ. शिवेंद्रसिंहराजे संपर्क करत आहेत.
सातारा शहरातील बहुतांश हॉस्पिटल्समधील ऑक्सिजन संपत आला आहे आणि त्यामुळे रिस्क नको म्हणून हॉस्पिटल प्रशासनाकडून बेड रिकामे असले तरी कोरोना बाधित रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही, अशी माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे यांना समजली. यानंतर तातडीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी थोरवे यांच्याशी संपर्क साधून रुग्णालयांचा ऑक्सिजन साठा आणि पुरवठा याची माहिती घेतली. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपला म्हणून रुग्णांवरील उपचार थांबू नयेत अथवा रुग्ण दगावण्याची दुर्दैवी घटना घडू नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
दरम्यान, जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत असावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा ना. अजित पवार यांच्याशी संपर्क सुरू असून, जिल्ह्यातील हॉस्पिटल्सना ऑक्सिजन आवश्यक प्रमाणात उपलब्ध व्हावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे ना. अजित पवार यांच्याकडे करत आहेत. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरू राहावा आणि बाधित रुग्णांवर उपचार वेळेत व्हावेत, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.