औषधांच्या नावाआडून गोवा बनावटीची दारू तस्करी करणारा ट्रक पकडला
News By : Muktagiri Web Team
लोहारवाडी ता. कराड गावचे हद्दीत कराड चांदोली रोडवर औषधाच्यां नावाआडून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागांने ताब्यात घेतला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रक चालकास अटक केली आहे. त्याच्याकडून 87 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बनवारी राम वय 33 रा. हरि राम गोदारा की दानी हरलाया नानू जोधपुर ननेऊ राजस्थान याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त राज उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर चे विजय चिंचाळकर यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग सातारचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग कराडचे पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार लोहारवाडी ता. कराड गावच्या हद्दीत कराड चांदोली रोडवर दहा चाकी ट्रक गोवा बनावटीची दारूची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लोहारवाडी गावच्या हद्दीत ट्रक थांबवून ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये 87 लाख 11 हजार रुपये किमतीची गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेले रॉयल ब्ल्यू मार्ट व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 15000 सीलबंद बाटल्या मिळवून आल्या. याप्रकरणी ट्रकचालक बनवारी राम याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी .आर. गायकवाड, जवान विनोद बनसोडे, महिला जवान राणी काळोखे यांनी केली.
अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग कराड च्या दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील करीत आहेत
जिल्ह्यामध्ये बनावट दारू तसेच हातभट्टी दारू निर्मिती विक्री वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारूची निर्मिती विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक वैभव वैद्य यांनी केले आहे.