मनसेच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
पाटण / प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांचे पनामा पवनचक्की कंपनी व महाराष्ट्र उर्जा विकास अधिकरण पुणे यांच्या विरोधात आमरण उपोषण गेली पाच दिवस सुरु आहे. आज पाचव्या दिवशी उपोषण कर्ते यांची प्रकृती अस्वस्थ झालेली असून पनामा पवनचक्की कंपनी व मेडा विभाग पुणे यांना सदर उपोषणाचे सोय सुतक नाही अस दिसून येत आहे.
सलग पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्बेत बिघडली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची तपासणी करुन आलेले आहेत. सदर उपोषण कर्ते यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला असून वैद्यकीय तपासणी केली असता उपोषणकर्त्यांची यदाकदाचित जिवितहानी झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र जबाबदार राहणार नाही. ही बाब गांभिर्याने घेऊन वरिष्ठांनी यावरती उचित कार्यवाही करावी अशी माहिती मोरगिरी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ नागेश्वर ननावरे यांनी तालुका अधिकार्यांना कळवली आहे.
मौजे पाचगणी याठिकाणचे शेतकरी संतप्त झालेले असून पाच दिवस झाले तरी प्रशासन डोळे झाकून गप्प बसले आहे. फक्त जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक लावणे ही आमची मागणी नाही. सदर टाँवर तात्काळ बंद करावा. पनामा पवनचक्की कंपनीच्या दबावाला मेडा पुणे विभाग घाबरत आहे. बलाढ्य कंपनी अधिकार्यांना जुमानत नाही ती आमच्या सारख्या गरिब शेतकर्यांना काय जुमानणार आहेत? तालुक्यातील प्रांत, तहसीलदार यांना आमचे काही सोयसुतक आहे की आम्ही मेल्यानंतर सगळं प्रशासन आम्हाला पाहायला येणार आहे? आम्हाला न्याय देणारे मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर आमच्या साठी जीवाची बाजी लावून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. आज पाचवा दिवस आहे त्यांना शारीरिक त्रास जाणवू लागला आहे जर उपोषण कर्तेयांना काही बरे वाईट झाले तर उपोषण ठिकाणी सदर टाँवर नंबर २५ येथे फास घेऊन आत्महत्या करु असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.