उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
News By : Muktagiri Web Team
उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्त्वाचे म्हणजे तीन दिवसांपूर्वीही रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त होते. मात्र, रतन टाटा यांनी स्वत: सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत यासंदर्भात खुलासा केला होता. ही बातमी अफवा असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटलं होतं. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशीरा त्यांचे निधान झालं.
रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी देखील रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. “जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ते म्हणाले.
याशिवाय रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. “रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेतृत्त्व, एक दयाळू व्यक्तीमत्त्व आणि एक विलक्षण माणूस होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व दिले. त्यांचे योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले. रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक कारणांमध्ये ते आघाडीवर होते. रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझे मन भरून आले आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत असे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करत असू. मला त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो तेव्हाही हे संवाद सुरूच होते. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.