दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा उंब्रज, दि. 17 ः मसूर ता. कराड येथील एटीएम जिलेटीनने फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला उंब्रज व तळबीड पोलिसांनी शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पूलानजीक सापळा रचून जेरबंद केले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. वैभव राजेंद्र साळुंखे (वय 33), ओमकार बाळासाहेब साळुंखे (वय 23), आदित्य संतोष जाधव (वय 19, सर्व रा. मोळाचा ओढा, सातारा) व एक अल्पवयीन असून अन्य एक जण पळून गेला आहे. याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी रात्री तळबीड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले हे रात्रगस्त साठी जात असताना शिवडे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पूलाच्या अलिकडे पाच जण संशयित रित्या आढळून आले. यावेळी त्यांनी उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्याशी संपर्क साधून पोलिस कर्मचारी स्टाफ यांना बोलावून घेतले व संशयितांना घेराव घातला असता त्यातील एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. यावेळी पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता, संशयितांकडू तीन कटावणी, चार जिलेटीन कांड्या, डेटोनेटर, बॅटरी, दोन एक्सा ब्लेड, करवत, कोयता ब्लास्टींग वायर, दोन मोटरसायकल व चेहऱ्याचे मास्क असा एकूण 1 लाख 37 हजार 980 रुपये किंमतीचे साहित्य हस्तगत केले. यावेळी पोलिसांनी संशयितांकडे अधिक चौकशी केली असता, संशियीतांनी आठ दिवसांपासून मसूर येथील हिताची कंपनीचे एटीएम सेंटर जिलेटीन ने उडवून टाकण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले. तसेच सदर जागेची व एटीएमची चार दिवसांपूर्वी रेकी केली होती. त्यानुसार दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना तळबीड व उंब्रज पोलिसांनी संयुक्त कारवाई करून संशयित दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात यश आले. यावेळी तळबीड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, पोलिस हवालदार निलेश विभुते, पाटील यांच्यासह उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलिस हवालदार धुमाळ, साळे, माने यांनी कारवाई केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे करीत आहेत.