पोलीस निरीक्षकांकडून माहिती घेण्यास सुरूवात... पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली आहे. आता याप्रकरणी कारवाई होऊन साहित्य पुन्हा बसविले जाईल. दानशूर व्यक्तींनी स्वतः झळ सोसून जनहितासाठी पोलीस चौकीला साहित्य देत निस्वार्थ भावनेने मदत केली होती. मात्र याच साहित्यावर स्वतःचा दावा सांगत त्यावर डल्ला मारण्याची प्रवृत्ती संतापजनक आहे. त्यामुळे ज्यांनी हा घृणास्पद प्रकार केला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी चर्चा सुरू आहे.
कराड, दि. 28 ः येथील बसस्थानक परिसरात असणाऱ्या पोलीस चौकीतील साहित्य दिवसा ढवळ्या गायब झाले असल्याची चर्चा कराड शहरात आहे. हे साहित्य गायब होऊन दहा दिवस झाले. मात्र याची साधी तक्रार सुद्धा कराड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली नाही. जर पोलीस चौकीतील साहित्य गायब होत असेल तर याकडे वरिष्ठांनी गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.
येथील बसस्थानकातील पोलीस चौकी वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी पाकीटमारांचाच खिसा कापणाऱ्या ‘राज' की बातमुळे चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता चौकीतील महागडे साहित्य अचानक गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस दलातच खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी साहित्य गायब होण्यामागील ‘राज' काय? याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या पोलीस दलामुळे सर्वसामान्य नागरिक निर्धास्त व सुरक्षित असल्याचे मानतात. मात्र याच पोलीस दलाचे बसस्थानक पोलीस चौकीतील काही साहित्य अचानक गायब झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चौकीतील साहित्य स्वतःचे असल्याचा दावा करत काहींनी ते नेल्याची चर्चाही सुरू आहे.
कराड बसस्थानक परिसरात अनेकदा सर्वसामान्य लोकांची लूट होत होती. तसेच अनेकदा एसटीमध्ये बसताना गर्दीचा फायदा घेत पाकीट तसेच पैसे व दागिने चोरून नेल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळेच तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पुढाकार घेत पोलीस चौकीचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मदत करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडून करण्यात आले होते. त्यामुळे काही दानशूर व्यक्तींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे बसस्थानकातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एलईडी, बसण्यासाठी खुर्च्या तसेच अन्य आवश्यक साहित्य दिले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत या पोलीस चौकीचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले होते. मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पोलीस चौकीतील काही साहित्य गायब असून यास पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनीही दुजोरा दिला आहे.
जे साहित्य गायब झाले आहे, ते साहित्य स्वतःचे असल्याचे काहींचा दावा असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच त्यांनी ते नेल्याची चर्चा आहे. बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीचे पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले, त्यावेळी काही कर्मचार्यांनी स्वतः पदरमोड करत साहित्य चौकीसाठी दिले होते का ? जर कर्मचाऱ्यांनी साहित्य दिले होते, तर मग शहरातील दानशूर व्यक्तींचे सत्कार केेले, त्यांनी पोलीस चौकीला काहीच साहित्य दिले नव्हते का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस गुन्हा दाखल करणार का?
कराड बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीतील साहित्य दिवसा ढवळ्या गायब होते. मात्र याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्याने गुन्हा का दाखल झाला नाही असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पोलीस अधीक्षक याप्रकरणात लक्ष घालणार का अन् साहित्य चोरीस गेले याची तक्रार दाखल होऊन त्याबाबत गुन्हा नोंद करून चौकशी होणार का? याकडे कराडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.