"रात्री उशिरापर्यंत चौघांची चौकशी" :----
तडजोडीच्या या प्रकरणात दोन खासगी व्यक्ती सहभागी असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्याकडून चौकशी केली जात आहे. पोलीस उपअधिक्षक कार्यालयात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात चौघांची कसून चौकशी सुरू होती.
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः येथील बसस्थानकात चोरी करताना सापडलेल्या पाकिटमारांसोबत पोलिसांनीच आर्थीक तडजोड केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी तातडीने सखोल चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकाराचा गोपनिय अहवाल उपअधिक्षकांना पाठवला असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नसून जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले. याबाबतची सविस्तर माहिती अशी, कराडच्या बसस्थानकात चार दिवसांपुर्वी हरियाणातील चोरट्यांची टोळी चोरीसाठी आली होती. याबाबतची कुणकूण लागताच बसस्थानक पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून तिघांना पकडले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत पुढील कार्यवाही सुरू केली. मात्र, याचदरम्यान पकडलेल्या चोरट्यांनी तडजोडीचा पर्याय समोर ठेवला. त्या तडजोडीचा आकडा एवढा मोठा होता की, संबंधित पोलिसांनी कायदा गुंडाळून ठेवत तडजोडीला होकार दिला. ठराविक रक्कम ठरवून ‘राज' की बात येथेच मिटविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार चोरट्यांनी त्यांच्या साथीदारांना फोन करुन पैशाची जुळवाजुळव केली. ते पैसे मंडईतील एका खासगी व्यक्तीच्या खात्यावर ऑनलाईन जमा केले गेले. त्यानंतर त्या व्यक्तीने ते पैसे संबंधित कर्मचाऱ्यांना पोहोच करून आपला ‘हिस्सा' काढून घेतला. तर पोलिसांसह त्यांच्या खबऱ्यांनी रक्कम वाटून घेतली. त्यानंतर पकडलेल्या चोरट्यांना सोडून देण्यात आले. ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप' म्हणत संबंधित पोलिसांनी हे प्रकरण दडपले खरे; पण शुक्रवारी याचा भांडाफोड झाला. पोलिसांचे हे कृत्य चव्हाट्यावर आले. त्यामुळे पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना दिले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी चौकशी करून त्याबाबतचा गोपनिय अहवाल पोलीस उपअधिक्षकांना दिला आहे. उपअधिक्षकांकडून हा अहवाल अधिक्षकांना पाठविला जाणार आहे.