तब्बल दहा लाखांच्या गुटख्यावर कारवाई, एकास अटक
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 18 ः घोगाव ता. कराड गावच्या हद्दीत अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्या टेम्पोसह एकास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यामध्ये 9 लाख 64 हजार 960 रूपये किमतीची विमल पान मसाल्याची पोती व चार लाख रूपये किमतीचा अशोक लेलंड छोटा हत्ती असा एकूण 13 लाख 64 हजार 960 रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. समीर बाबासो मुलाणी (वय 33, रा. लाहोटीनगर, मलकापूर ता. कराड) असे गुटखा वाहतुकप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ, गुटखा आणि दारूबंदी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेस गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, घोगाव गावच्या हद्दीतून गुटख्याची वाहतुक होणार आहे. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, पोलीस हवालदार, सतिश जाधव व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, विनोद माने, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे, धनंजय कोळी, संदीप पाटील, सनिल माने, नितीन कुचेकर, नाना नारनवर यांनी घोगाव गावच्या हद्दीत सापळा लावला. पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे अशोक लेलंड छोटा हत्ती हे वाहन समोरून येताना दिसले. पोलिसांनी ती गाडी थांबवून चालकाकडे विचारपूस केली असता गाडीमध्ये गुटख्याचा माल घेऊन जात असल्याचे समीर मुलाणी याने सांगितले. पोलिसांनी गाडीत जाऊन पाहिले असता चालकाने पाठीमागील बाजूस कोणास शंका येऊ नये यासाठी तीन कापसाच्या मोठ्या आकाराच्या व पांढऱ्या रंगाच्या गोण्या रचल्याचे दिसून आले. त्याचे मागील बाजूस विमल गुटख्याचा माल व तंबाखू पड्यया भरलेल्या दिसून आल्या. महाराष्ट्रात गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाला बंदी असल्याचे सांगून त्याचा चालकाकडे परवाना आहे का विचारले असता चालकाने परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी गाडीतील 9 लाख 64 हजार 960 रूपये किमतीची विमल पान मसाल्याची पोती व चार लाख रूपये किमतीचा अशोक लेलंड छोटा हत्ती असा एकूण 13 लाख 64 हजार 960 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भिलारी करीत आहेत.