येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर; नागरिकांनी मतदानावरचा बहिष्कार मागे घ्यावा
कराडचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांचे आवाहन
Published:7 m 1 d 19 hrs 4 min 5 sec ago | Updated:7 m 1 d 19 hrs 4 min 5 sec ago
News By : कराड | संदीप चेणगे
कराड : - येणके ता. कराड येथील कुंभार वस्तीसाठी जलजीवन मिशन अंतर्गत वितरण व्यवस्था व नळ जोडणी करण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. या कामातील दाबनलिकेचे काम पूर्ण झाले आहे. वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीत आहे. कुंभार वस्ती येथील नागरिकांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन कराड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांनी केले आहे. येणके येथील कुंभार वस्ती येथील योजने सद्यस्थितीची प्रगती 40 टक्के इतकी असून उर्वरित काम येत्या 4 ते 5 महिन्यात पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात येणार आहे. या योजनेद्वारे गावच्या पाणीपुरवठा विषयक समस्या कायम स्वरुपी मिटणार असल्याने कुंभार वस्तीतील नागरिकांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहनही कराडच्या गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांनी केले आहे.