कराड वाहतुक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करा
News By : Muktagiri Web Team
कराड, दि. 9 ः मागील दहा दिवसापूर्वी कोयनावसाहत येथे महिला वाहतुक पोलीस कर्मचारी सोनम पाटील यांनी दुचाकीस्वार याची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. या घटनेची वरिष्ठामार्फत सखोल चौकशी करावी. तसेच चौकशीअंती दोषी आढळलेस संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्व इंडियन पार्टीच्यावतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना मंगळवारी देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शनिवार दि. 29 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मलकापूर येथील कोयना वसाहत कमानीलगत कर्तव्य बजावत असणाऱ्या वाहतुक शाखेच्या महिला कर्मचारी सोनम पाटील व दुचाकीस्वार यांचेत वाहतुक नियमांचे उल्लंघानावरून शाब्दीक वाद झाल्याने वाहतुक महिला कर्मचारी सोनम पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था यांचा समतोल न राखता रागाच्या भरात दुचाकीस्वाराची कॉलर पकडून अरेरावीच्या भाषेचा वापर करून जमलेल्या गर्दीसमोर दुचाकीस्वारास मारहाण करून वर्दीचा गैरवापर केला.
वास्तविक संबंधित महिला पोलीस कर्मचारी यांनी सदर घटनेदरम्यान घटीत कृत्य न करता वाहतुक यंत्रणेमार्फत पुरविलेल्या ई-चलन मशिनच्या सहाय्याने फोटो घेऊन संबंधित दुचाकीस्वारावर व वाहनावर आर्थिक दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वाहतुक पोलीस अधिकाऱ्याविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. तरी वरिष्ठांनी सदर घटनेची सखोल चौकशी करावी. व अशा निंदनीय घटना भविष्यात घडू नये याची काळजी घ्यावी. तसेच चौकशीअंती दोषी आढळलेस संबंधित महिला पोलीस कर्मचारी यांचेवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा विश्व इंडियन पार्टीच्यावतीने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनावर विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, कराड तालुका अध्यक्ष निवास माने, माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, कराड तालुका कार्याध्यक्ष मयुर लोंढे, उषा पोस्ते, सुरेश कांबळे, संजय चव्हाण, राजेंद्र ताटे, विलास नलवडे, अमृत जाधव, राहुल देशमुख यांच्या सह्या आहेत.