विरवडे येथे घरफोडी करणारी टोळी जेरबंद
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 6 ः विरवडे ता. कराड येथील गणेश फाउड्री कारखान्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करून पोलिसांनी सहाजणांना अटक केले. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अटक केलेल्या टोळीकडून दीड लाख रूपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला तीन चाकी टेम्पो जप्त करण्यात आला आहे. राजेश उर्फ नितीन बबन चव्हाण (वय 45), अभिजीत विजय मदने (25), अभिजीत उत्तम तीरमारे (30), संतोष बाबुराव जाधव (45), विशाल विजय मदने (25, सर्व रा. बनवडी, ता. कराड) आणि अजय जगु मोरे (वय 25, रा. नांदगाव, ता. कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील विरवडे येथील गणेश फाउंड्री कारखान्यात 24 ते 27 मार्च या कालावधीत चोरी झाली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल व उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ओगलेवाडी दुरक्षेत्राचे अधिकारी आर. एस. पवार यांच्यासह गुन्हे शाखेचे गणेश कड व पथक या गुन्ह्याचा तपास करीत होते. तपासात आरोपींबाबत ठोस माहिती उपलब्ध झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले. सुरुवातीला राजेश उर्फ नितीन चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून त्याच्या इतर साथीदारांची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या पितळेच्या बेरिंग प्लेटा व गुन्ह्यात वापरलेला तीन चाकी टेम्पो असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. सदरची कामगिरी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ओगलेवाडी दूरक्षेत्राचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस हवालदार सचिन सुर्यवंशी, प्रविण काटवटे, धीरज कोरडे, महेश शिंदे, कपिल आगलावे व जाधव यांनी केली.