मर्डर की दरोडा विद्यानगर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या रेकॉर्डवरील पाचजणांपैकी दोघांजणावर दरोडेसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ते विद्यानगर परिसरात मर्डर की दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले होते, याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 21 ः कराड शहर परिसरातील ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत टोळीला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन गावटी पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन कोयते चिकट टेप पाच दोऱ्या व एक चाकू असा एकूण तीन लाख 37 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास केली. यामध्ये एक जण फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाली आहे. बबलू उर्फ विजय संजय जावीर (वय 32 रा. शहापूर इचलकरंजी, ता. इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर), निकेत वसंत पाटणकर (वय 30 रा. साईबाबा मंदिराजवळ गोडोली सातारा, ता. सातारा, जि. सातारा), सुरज नानासो बुधावले (वय 24, रा. बुधावलेवाडी विसापूर पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल अरुण मेनन (वय 24, रा. कुईल कुडम त्रिशूल, केरळ राज्य, सध्या रा. सैदापूर आयटीआय कॉलेज जवळ कराड) तर फरार असलेल्या संशयीताचे नाव आकाश आनंदा मंडले (रा. खटाव, पोस्ट वसगडे, ता. पलूस, जिल्हा सांगली) असे आहे. याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विद्यानगर परिसरात गेल्या दोन महिन्यापासून रेकॉर्डवरील पाचजण वास्तव्यात आहेत. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आणि कराडमधील एकाचा समावेश आहे. सोमवारी सकाळी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला हे पाचजण विद्यानगर परिसरात रूम घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन छापा टाकला असता पोलिसांना पाहून सर्वजण सैरभर पळू लागले. पोलिस आणि रेकॉर्डवरील गुंड यांच्यामध्ये यावेळी झटापटही झाली. त्यावेळी पाचजणापैकी तिघेजण पोलिसांच्या हाती लागले. तर दोघेजण पळून गेले. त्यानंतर दुपारी पोलिसांनी एकास पाटण परिसरातून ताब्यात घेतले. तर आणखी एका संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांकडे कसून चौकशी केली असता कराड शहर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून तीन पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन कोयते चिकट टेप पाच दोऱ्या व एक चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनास्थळी डीवायएसपी अमोल ठाकूर, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी भेट दिली. या घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर हे तात्काळ कराडमध्ये दाखल झाले. त्यांनी पोलिसांना योग्य त्या सूचना करून पुढील कार्यवाही करण्यास सांगितले.