सरसकट रूग्णांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार द्या
News By : Muktagiri Web Team
कराड
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व एकत्रीत आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंअंतर्गत समाविष्ट यादीतील आजाराच्या रूग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. मात्र या व्यतीरीक्त असलेल्या रूग्णांनाही 5 लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
याबाबत सार्वजनीक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, मनोज माळी, शिवाजी चव्हाण, भानूदास डाईंगडे बंटी मोरे आदींची उपस्थिती होती. मनोज माळी यांनी दिलेल्या माहितीनूसार, राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दिड लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येत आहेत. तर केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या एकत्रीत आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंअंतर्गत पाच लाख रूपयापर्यंतचे मोफत उपचार देण्यात येत आहेत.
योजनेअंतर्गत जवळपास 1365 आजारांवर उपचार करण्यात येतात. मात्र योजना लागू असलेल्या रूग्णालयात रूग्ण दाखल झाल्यानंतर त्याला तत्काळ योजनेचा लाभ मिळत नाही. त्या रूग्णाला तपासण्या व योजनेत सहभागी होई पर्यंत स्व खर्चाने उपचार घ्यावे लागत आहेत. यात रूग्णांचे लाखो रूपये बिल होत आहे. तसेच योजनेत समाविष्ठ नेसलेल्या आजारांवर उपचार घेताना त्या रूग्णाला शेती व घर विकावे लागत आहे. त्यामुळे योजना लागू असलेल्या रूग्णालयात दाखल होणाऱ्या सरसकट आजाराच्या रूग्णांवर पाच लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार करण्याची मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच याबाबत शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्याचे अश्वासन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्याचे मनोज माळी यांनी सांगीतले.