बसस्टँड चौकीमधील त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 4 ः येथील बसस्थानकात चोरी करताना सापडलेल्या पाकिटमारांसोबत पोलिसांनीच आर्थीक तडजोड केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी बसस्टँड चौकीमधील त्या दोन्ही कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. यातील एका कर्मचाऱ्याच्या ओगलेवाडी पोलीस चौकीत तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची मलकापूर बीटात तात्पुरती नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली. याबाबतची सविस्तर माहिती अशी, कराडच्या बसस्थानकात आठ दिवसांपुर्वी हरियाणातील चोरट्यांची टोळी चोरीसाठी आली होती. याबाबतची कुणकूण लागताच बसस्थानक पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून तिघांना पकडले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत पुढील कार्यवाही सुरू केली. मात्र, याचदरम्यान पकडलेल्या चोरट्यांनी तडजोडीचा पर्याय समोर ठेवला. यात ठराविक रक्कम ठरवून ‘राज' की बात येथेच मिटविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार चोरट्यांनी त्यांच्या साथीदारांना फोन करुन पैशाची जुळवाजुळव केली. ते पैसे मंडईतील एका खासगी व्यक्तीच्या खात्यावर ऑनलाईन जमा केले गेले. त्यानंतर पोलिसांसह त्यांच्या खबऱ्यांनी रक्कम वाटून घेतली व चोरट्यांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी हे प्रकरण दडपलेल्या प्रकरणाचा शुक्रवारी भांडाफोड झाला. त्यामुळे पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना दिले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी चौकशी करून त्याबाबतचा गोपनिय अहवाल पोलीस उपअधिक्षकांना दिला आहे. उपअधीक्षकांनी या प्रकरणात पाचजणांची कसून चौकशी केली. तर याप्रकरणाशी संबंधित अन्य दोघांचे जबाब घेण्यात येणार आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस दलाची मान शरमेने खाली घालवणाऱ्या बसस्टँड चौकीमधील त्या दोन्ही कर्मचाऱ्यांची शनिवारी उचलबांगडी करण्यात आली. यातील एका कर्मचाऱ्याची ओगलेवाडी पोलीस चौकीत तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची मलकापूर बीटात तात्पुरती नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी देत दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही दिला.