कराड बसस्थानकातील या प्रकाराबाबत माहिती घेत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याची चौकशी करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून या घटनेची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होईल. - अमोल ठाकूर, पोलीस उपअधिक्षक, कराड
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 2 ः येथील बसस्थानकात पाकिटमार नेहमीच घुटमळत असतात. बेसावध लोकांचा व एसटीमध्ये चढताना महिलांच्या गळ्यातील दागिन्यावर ते डल्ला मारतात. पण कराडच्या बसस्थानकात एका पाकिटमाराचाच खिसा कापला गेला. चोरी करताना सापडल्यानंतर त्याला ही ‘राज' की बात दडपण्यासाठी वर्दीतील ‘मॅडम'चा खिसा गरम करावा लागला. त्यानंतर मॅडमने आणखी काही जणांचा 'विकास' करून दिला. त्यानंतर त्याच्यासह त्याचे साथीदारही आपला हात सोडवून कराडातून पसार झाले. कराडात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेसाठी गत आठ दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. त्यावेळच्या धामधुमीतच कायद्याच्या दोन रक्षकानी आपला डाव साधला. त्याचं झालं असं हरियाणाची पाकीटमारांची टोळी कराड बसस्थानकात हात मारण्यासाठी आली होती. याची खबर बसस्थानकातील कायद्याच्या रक्षकांना लागली. त्यानी बरोबर चोरट्यांना हेरले. याची कुणकुण चोरट्यांना लागताच त्यांनी बसस्थानकातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तीन पाकिटमार कायद्याच्या रक्षकाच्या हाती लागले. तर त्याचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या चोरट्यांना केबिनमध्ये आणून पुढील प्रक्रिया पार पाडण्याचे काम सुरू झाले. मात्र, यावेळी ‘सेटलमेंट'चा पर्याय कायद्याच्या रक्षकापुढे ठेवण्यात आला. तो पर्याय एवढा मोठा होता की, त्यापुढे सर्व कायदे गळून पडले. सुमारे एक लाख 90 हजार रूपये रक्कम त्यावेळी ठरविण्यात आली. चोरट्याजवळ तेवढे पैसे नसल्याने त्याने त्याच्या अन्य साथीदारांना फोन करून ठरलेली रक्कम जमा करण्यास सांगितली. मात्र, रोख रक्कम पोहोच होणे शक्य नसल्याने ‘ऑनलाइन पेमेंट'चा पर्याय कायद्याच्या रक्षकाकडूनच त्या चोरट्याला देण्यात आला. चोरट्याने लगोलग आपल्या साथीदारांना सांगून कायद्याच्या रक्षकाने सांगितलेल्या मंडई परिसरातील एकाच्या अकाऊंटवर ऑनलाईन पैसे मागवून घेतले. त्यानंतर त्या चोरट्याना सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे. पंतप्रधानांच्या सभेची धामधूम सुरू असताना बसस्थानकात झालेली ही तडजोड कोणाच्याही लक्षात आली नसल्याचा संबंधित कायद्याच्या रक्षकाचा समज आहे. मात्र, प्रत्यक्षात या तडजोडीमध्ये 'राज' की बात दडपण्यासाठी अनेकांचा 'विकास' झाला. या घटनेची बसस्थानकासह परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
किती वाटेकऱ्यांचा ‘विकास’ झाला?
- कराडच्या बसस्थानकात झालेल्या या तडजोडीत ‘वाटेकरी’ आहेत. चोरट्यांकडून विशिष्ट खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर त्या मिळालेल्या रक्कमेचे वाटे करण्यात आले आहेत. तसेच ठरल्यानुसार ती रक्कम वाटून घेण्यात आली असून तडजोडीतून साधलेला हा ‘विकास’ संबंधितांना पचणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.