बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या पारंगे चौकातून पोवईनाक्याकडून भरधाव वेगाने रुग्णाला आणण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची एका दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले.
सातारा : बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या पारंगे चौकातून पोवईनाक्याकडून भरधाव वेगाने रुग्णाला आणण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची एका दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. तसेच रुग्णवाहिकाही खांबाला धडकल्याने रुग्णवाहिकेचा चालकही जखमी झाला. हा अपघात मंगळवारी भर दुपारी झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवईनाक्याहून रुग्णवाहिका रुग्णाला आणण्यासाठी सायरन वाजवत भरधाव वेगाने पोलीस कवायत मैदानावरील चैतन्य हॉस्पिटलकडे निघाली होती. त्याच दरम्यान सातारा बसस्थानकाच्या बाजुने दुचाकीवरून दोन युवक फळे घेवून जिल्हा रुग्णालयाकडे रुग्णाला पाहण्यासाठी चालले होते.
दुचाकीस्वार पारंगे चौक ओलांडत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या रुग्णवाहिकेने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी काही अंतर फरफटत गेली. तर दुचाकीवरील एक युवक रस्त्यावर पडला तर दुसरा युवक नाल्यात फेकला गेला. तर रुग्णवाहिका नाल्याशेजारी असलेल्या खांबाला जावून धडकली. या अपघातानंतर चौकातील रिक्षा थांब्यावरील रिक्षाचालकांसह काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संबंधित जखमी दोन युवकांना रुग्णालयात हलविण्यात आले.
अप्पर पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
घटनास्थळी अप्पर पोलीस अधिकांची भेट रुग्णवाहिकेस अपघात झाल्याचे समजताच अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघाताची पाहणी करुन प्रथम जखमींना दवाखान्यात नेले की नाही याची विचारणा केलीं. त्यानंतर पाठोपाठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, हवालदार राहूल खाडे घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळी जमलेली गर्दी बाजूला केली. त्यानंतर पूर्ववत वाहतूक झाली.