प्रशासनाने आवाहन करून देखील पुसेगाव (ता. खटाव) बाजारपेठेत कोणत्याही नियमाचे पालन न करता नागरिक बिनधास्त वावरत असल्याने या ठिकाणी कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. येथील वाढत्या कोरोना आलेखाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने शुक्रवार (दि. 2) पासून पुसेगावसह परिसरात विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली.
पुसेगाव : प्रशासनाने आवाहन करून देखील पुसेगाव (ता. खटाव) बाजारपेठेत कोणत्याही नियमाचे पालन न करता नागरिक बिनधास्त वावरत असल्याने या ठिकाणी कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. येथील वाढत्या कोरोना आलेखाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने शुक्रवार (दि. 2) पासून पुसेगावसह परिसरात विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली.
दरम्यान, पुसेगावसह परिसरात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या नियमांची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस तसेच महसूल प्रशासनाने नागरिकांना जाहीर आवाहन करून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये. शासन नियमांचे पालन करावे, कार्यक्रमांमध्ये गर्दी कमी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी संदेशात म्हटले आहे. तसेच जे विक्रेते किंवा दुकानदार मास्क लावत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई होईल.
सर्व दुकानदारांनी दुकानात दोरी लावावी, सॅनिटाझर ठेवावे, मास्क लावावेत, ग्राहकांना मास्क लावायला सांगावे अशा सूचना संपूर्ण बाजारपेठेत लाऊड स्पीकरच्या माध्यमातून सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी दिल्या आहेत.
पुसेगावात शुक्रवारी विनामास्क फिरणार्या 26 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे एकूण पाच हजार दोनशे रुपये तर एक सोशल डिस्टन्स न पाळणे दोन हजार रुपये असा एकूण सात हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई प्रांताधिकारी जनार्दन कासार, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब लोंढे-पाटील, किरण देशमुख, सुनील अबदागिरी आदी कर्मचार्यांनी केली.
प्रशासनाला सहकार्य करावे..
नागरिकांनी घरातून बाहेर निघताना तोंडास मास्क लावणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई केली जाईल. आपल्या आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी केले आहे.