फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या
News By : फलटण | युवराज पवार
गोपाळ बदने निलंबित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून फोनद्वारे माहिती घेतली आणि त्यांनी कठोर कारवाईसाठी स्पष्ट आदेश देऊन संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.
फलटण : फलटण उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका २९ वर्षीय महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलीस उपनिरीक्षकाकडून अत्याचार व अन्य एकांकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या कारणावरून
आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार फलटण शहरात घडला आहे. ऐन भाऊबीजे दिवशीच एका महिला डॉक्टरला आत्महत्यचे पाऊल उचलावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यासंबंधी जबाबदार असणाऱ्यावर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या हातावर काही मजकूर लिहिला असून त्यामध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने आपल्यावर अत्याचार केल्याचा उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदने यास तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, बदने याच्यासह अन्य संशयीत आरोपी प्रशांत बनकर फरारी आहेत.
याबाबत घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील एक महिला वैद्यकीय अधिकारी फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांनी यांनी दिनांक २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास रिंग रोडवरील हॉटेल मधुदीप येथे रूम बुक केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी व दुपारच्या सुमारास दरवाजा वाजवूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर संध्याकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास डुप्लिकेट चाविने दरवाजा उघडून पाहिले असता, त्यांना संबंधित महिला डॉक्टर यांनी रूम मधील पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील शवागारात शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह नेण्यात आला असता, त्यांच्या हातावर पेनाने काहीतरी मजकूर लिहिला असल्याचे दिसून आले. त्याबाबतची पाहणी मृत महिला वैद्यकीय अधिकारी यांचे भाऊ यांनी केली असता, त्यांना हातावर माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आहे, त्याने गेली पाच महिने माझ्यावर अत्याचार केला. त्याचबरोबर प्रशांत बनकर यांने गेली पाच वर्ष शारीरिक व मानसिक छळ केला असा मजकूर पेनाने लिहिल्याचे आढळून आले. त्यानंतर मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी फलटण येथे शवविच्छेदन न करता ते सातारा येथे इन कॅमेरा करण्यात यावे अशी मागणी केल्याने आज सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास मृतदेह सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात हलवीण्यात आला.
मृत महिला डॉक्टर ने हातावर उल्लेख केलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे तर प्रशांत बनकर हा सदर महिला रहात असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी मयत मला महिला वैद्यकीय अधिकारी यांचा चुलत भाऊ प्रमोद धनराज मुंडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली आहे. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांच्यावर बलात्काराचा व आत्महत्तेस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा नों.क्र.३४५/२०२५ कलम ६४(२) (एन), १०८ भा.न्या. संहि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर यातील दोन्ही संशयित आरोपी फरारी असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यास निलंबित करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे हे करीत आहेत.
- .......तर ती आज हयात असती..! डॉ. संपदा किसन मुंडे यांनी त्यांच्यावर येत असलेल्या दबावा बाबत लेखी तक्रार वरिष्ठांकडे केली होती अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. जर तिच्या तक्रारीची दाखल घेतली गेली असती तर कदाचित ही महिला डॉक्टर आज हयात असती. परंतु तसे न झाल्याने तिला जीव द्यावा लागला. त्यामुळे तिच्या अर्जाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठांवर देखील कारवाई केली जावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
- बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे त्यातच शिक्षित महिलांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे उच्चशिक्षित असणाऱ्या व एकविसाव्या शतकात विविध क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवत असताना सावित्रीचा वारसा सांगणाऱ्या लेकीने ऐन दिवाळीत भाऊबीजेला आपली जिवनयात्रा संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


