सोनहिरा कारखान्याचा अंतिम ऊसदर ३२८० रुपये
News By : Muktagiri Web Team
कडेगाव, ता. २२ : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यास २०२४-२५ या गळीत हंगामात पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ३२८० रुपये अंतिम दर जाहीर करण्यात येत आहे. कारखान्याने आतापर्यंत गळितास आलेल्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये दर दिला आहे. आणखी प्रतिटन ८० रुपये दिवाळीपूर्वी वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार विश्वजित कदम यांनी दिली.
वांगी ( ता.कडेगाव ) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. उपाध्यक्ष दिलीप सूर्यवंशी, भारती विद्यापीठाचे
कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, संचालक रघुनाथराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जयसिंगराव कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, जितेश कदम, संचालक दीपक भोसले आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, "माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नाने कडेगावसह दुष्काळी टापूत ताकारी व टेंभू योजनांचे पाणी आले. माजी आमदार मोहनराव कदम यांनी कारखाना प्रगतिपथावर नेण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने राज्य व देशपातळीवरील २६ पुरस्कार मिळविले आहेत, 'एआय' टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी कारखान्याने पुढाकार घेतला आहे. "
२०२४-२५ या हंगामात उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा 'डॉ. पतंगराव कदम ऊसभूषण' तसेच गुणवंत कर्मचाऱ्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यकारी संचालक शरद कदम यांनी अहवाल व नोटीस वाचन केले. दिग्विजय कदम, भीमराव मोहिते, सुरेश थोरात, तानाजीराव शिंदे, सयाजीराव धनवडे, उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या सन्मान :
- डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील गळीत हंगाम २०२४-२५ मधील विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवांना तसेच गुणवंत कर्मचाऱ्यांना कारखान्याच्या वतीने ऊस भूषण पुरस्काराचे वितरण केले. विजेते शेतकरी
- आडसाली हंगाम : प्रकाश सूर्यवंशी (वांगी) प्रथम, आनंदराव साळुंखे (खेराडे विटा) द्वितीय, सुरेश धनवडे (भाळवणी) तृतीय.
- पूर्व हंगाम: पोपट गवळी (रामापूर) प्रथम, रामदास पोळ (सासपडे) द्वितीय. सुरु हंगाम : अनिल लाड (बांबवडे) प्रथम, बापूसो नलवडे ( वांगी) द्वितीय.
- खोडवा हंगाम : विनायक साळुंखे (खेराडे विटा) प्रथम, आनंदराव साळुंखे (खेराडे विटा) द्वितीय, शरद मरगळे (खेराडे विटा) तृतीय.
- गुणवंत कामगार पुरस्कारः उत्पादन विभाग अशोक भोसले, सुरक्षा विभाग दीपक पवार, शेती विभाग विजय देशमुख
- विजेत्या सर्वाना रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार केला.


