लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिरातील दर रविवारची पूजा ही नाथ भक्तांना पर्वणी ठरत असून, या दीड वर्षातील प्रत्येक रविवारी श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी भक्तांच्या वतीने व सालकरी अविनाश गुरव यांच्या कल्पक बुद्धीने पूजा केली जाते.
म्हसवड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिरातील दर रविवारची पूजा ही नाथ भक्तांना पर्वणी ठरत असून, या दीड वर्षातील प्रत्येक रविवारी श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी भक्तांच्या वतीने व सालकरी अविनाश गुरव यांच्या कल्पक बुद्धीने पूजा केली जाते.
अडीच वर्ष दुष्काळ, पूरपरिस्थिती व वर्षापासून कोरोना महामारीने शेतकरी राजा पुरता हैराण झाला असून, शेतकर्यावर आलेले संकट दूर व्हावे व शेतकरी राजाला सुखाचे व अन्नधान्याने शेती-पाण्याचे चांगले दिवस येवो, त्याच्या कुटुंबात सुख लागो त्याप्रमाणे म्हसवड व परिसरातील भक्तांचे आरोग्य कोरोनामुक्त व्हावे, हिच श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी चरणी प्रार्थना करून अन्नधान्याची आरास मंदिर परिसरात करण्यात आली होती. श्रींच्या मूर्तींना ही हिरवळीने आकर्षक बनवल्याने ही सजावट पाहण्यासाठी नाथभक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
रविवार हा श्री सिद्धनाथ महाराज यांचा मुख्य दिवस असल्याने या दिवशी मंदिरात मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून भक्तगण दर्शनासाठी येत असतात. या दिवशी विशेष आरास मंदिराचे मुख्य सालकरी अविनाश गुरव हे करतात व गत वर्षापासून ते मंदिराचे मुख्य सालकरी म्हणून देवस्थान ट्रस्ट यांनी त्यांच्याकडे पदभार दिला असला तरी कोविड व लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद असल्याने भाविक मंदिराकडे फिरकले नसल्याने मंदिरे ओस पडली होती. लॉकडाऊन उठल्यानंतर मंदिरे उघडण्यात आल्यानंतर भाविकांची श्रद्धा मंदिराकडे आकर्षित होत गेली.
त्यात सिद्धनाथ व जोगेश्वरी यांचा रविवार हा मुख्य दिवस असल्याने भक्तांची गर्दी वाढावी यासाठी रोज वेगवेगळी आरास करण्यात येते. तर रविवारची पूजा ही विशेष बांधून भाविकांचे पाय मंदिराकडे वळवण्याचे महत्त्वपूर्ण काम सालकरी अविनाश गुरव, पप्पू गुरव, कलाकार महेश सोनवणे व सेवेकरी यांनी बळीराजाचा भावनिक विषय कलेतून मांडल्याने अनेकांनी धन्यवाद दिले आहे.
विविध प्रकारच्या कडधान्याच्या साहाय्याने संपूर्ण मंदिरात व श्रींच्या मूर्तीस गहू, ज्वारी, बाजरी, मका, मटकी, हरभरा, तांदूळ, जवस सर्व प्रकारच्या थाळी, मीठ, ऊस, मक्याची ताटांनी मूर्ती सजवण्यात आल्याने सिद्धनाथ मंदिर व श्रींची मूर्ती मनमोहक दिसत होती.