कराड अर्बन बँकेस आणखी ५ नवीन शाखा सुरू करण्यास मान्यता :- डॉ. सुभाष एरम
News By : कराड | संदीप चेणगे
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, रायगड, मुंबई व उपनगरे या कार्यक्षेत्रात बँकींग सेवा देणारी तसेच रू.१०० कोटींपेक्षा जास्त भागभांडवल असणाऱ्या देशातील १२ नागरी सहकारी बँकांपैकी एक आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख अर्थवाहीनी असलेल्या दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराड बँकेस पाच (५) नवीन शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली. सभासद-खातेदारांचा बँकेवर असणारा अढळ विश्वास आणि सेवकांची कार्यतत्परता यामुळेच बँक वेळोवेळी यशाचे टप्पे पार करत सर्व स्तरांवर प्रगती करत असल्याचे देखील डॉ. सुभाष एरम यावेळी म्हणाले. सध्याची असणारी मजबूत आर्थिक स्थिती व भविष्यातील शिस्तबद्ध नियोजन यांचा अभ्यास करून बँकेने डिसेंबर २०२३ मध्ये नवीन शाखांना परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. याप्रस्तावास रिझर्व्ह बँकेने अवघ्या एका महिन्यात सकारात्मक प्रतिसाद देत बार्शी (जि. सोलापूर), पंढरपूर (जि. सोलापूर), वाई (जि. सातारा), सांगोला जि. सोलापूर) आणि सातारा एम.आय.डी.सी. या पाच नवीन शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२३ मध्ये बँकेने विलिनीकरण करून घेतलेल्या सातारा येथील अजिंक्यतारा बँकेच्या १४ शाखांपैकी १० शाखांचे रिलोकेशन नवीन ठिकाणी करण्यासाठी परवानगी दिली होती. यानुसार चालू आर्थिक वर्षात बँकेने नवीन दहा (१०) ठिकाणी शाखा सुरू केल्या असून आणखी नवीन पाच (5) ठिकाणी शाखा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यामुळे बँकेस व्यवसाय वाढीसाठी संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी दिली. सध्या सहकार क्षेत्रामध्ये बँकींग करत असताना येणाऱ्या विविध अडी-अडचणी, रिझर्व्ह बँकेचे बदलणारे नियम आणि सहकारी बँकांवर असणारे बारीक लक्ष व नियंत्रण या सगळ्यांचा ताळमेळ राखत कराड अर्बन बँक सहकारी वित्तीय क्षेत्रामध्ये घट्ट पाय रोवून स्थिरावलेली आहे. बँकेने चालू वर्षाअखेरीस रू.५,००० कोटी एकूण व्यवसायाचा टप्पा पार करण्याचे उद्दीष्ठ ठेवले असून सर्व सेवकांच्या प्रयत्नाने ते पूर्ण करणारच असल्याचा विश्वास व्यक्त करून यापुढील काळातही बँक अतिउच्च ग्राहकसेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सांगितले. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्याधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.