दुष्काळी माण तालुक्यातील केसर आंबा निघाला दुबईस..
News By : Muktagiri Web Team
दुष्काळी माण तालुक्यातील खडकी येथील हरिभाऊ व प्रमोद वेदपाठक या शेतकरी बंधूंनी शासकीय अनुदान योजनेतून लागवड केलेल्या आंबा फळ बागेतील दहा टन केसर आंबा दुबईस विक्रीसाठी निर्यात करण्यात आला.
म्हसवड : दुष्काळी माण तालुक्यातील खडकी येथील हरिभाऊ व प्रमोद वेदपाठक या शेतकरी बंधूंनी शासकीय अनुदान योजनेतून लागवड केलेल्या आंबा फळ बागेतील दहा टन केसर आंबा दुबईस विक्रीसाठी निर्यात करण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांच्या हस्ते या बागेतील आंबा फळांची तोडणी करण्यात आली.
यावेळी प्रभाकर व भाग्यश्री वेदपाठक, प्रमोद वेदपाठक, प्रभारी मंडल कृषी अधिकारी सदाशिव बनसोडे, कृषी पर्यवेक्षक सिद्धार्थ भोसले, कृषी सहायक जयवंत लोखंडे, राहुल कांबळे, महेश वाघ, गणेश माळी, अक्षय कुंभार, संजय बेलदार, रणजीत आरगे, बापू केंजळे, महेश फुले व आंबा खरेदीदार व्यापारी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, ‘वेदपाठक कुटुंबास बागेतच प्रति किलो 140 ते 150 रुपये किलो दराने आंबा विक्री झाल्यामुळे या शेतकरी कुटुंबास सुमारे पंधरा लाखाचे उत्पन्न मिळू शकले. माण तालुक्यातील खडकी गावातील केसर आंबा प्रथमच विदेशातील दुबईच्या बाजार पेठेत निर्यात होत आहे. माण तालुक्यात अत्यंत कमी पावसाचे प्रमाण असल्यामुळे अवर्षण-प्रवण क्षेत्रात हा तालुका गणला जातो. या तालुक्यात मुरमाडट खडकाळ, चढउतार व डोंगरी भूभागाचा प्रदेश अधिक असूनही येथील हवामान मात्र सर्व प्रकारच्या फळ बागेस अत्यंत पोषक असे आहे.
या तालुक्यात शासकीय अनुदानातून 258 आंबा, एक हजार पाचशे डाळिंब, प्रत्येकी दोनशे हेक्टर पेरू व सीताफळाची लागवड झालेली आहे. या बरोबरच मोसंबी चिक्कू, संत्रा, ड्रैगन फ्रूट आदी फळबागांचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. गावोगावच्या शेतकर्यांनी पारंपरिक पिका ऐवजी फळबागावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असून निर्यातक्षम फळबागांचे शास्त्रीय पद्धतीने अचूकरीत्या संगोपन केले तर फळे निर्यात करून विक्रमी दराने विक्री करणे शक्य होत असते.
खडकी येथील श्री वेदपाठक शेतकरी कुटुंबाने कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनपर सुचनांचे पालन करुन आंबा बागेची जोपासना केल्यामुळेच निर्यातक्षम फळांसाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषास त्यांचा आंबा पात्र ठरला व या तालुक्यात प्रथम त्यांचा आंबा निर्यात झाला. त्यांच्या या अनुभवाचा इतर शेतकरी बांधवांनी फायदा घेऊन भविष्यात परदेशात निर्यात होईल त्या गुणवत्तेचे फळ उत्पादन करावे. फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या अनुदानातून ठिबक सिंचन, शेततलाव, अत्याधुनिक शेती अवजारे याबरोबरच शेती व फळबाग बाबत तज्ज्ञांची शेतकरी प्रशिक्षण शिबिरे सहली, कृषी खात्या मार्फत वेळोवेळी आयोजित केली जातात याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रभाकर वेदपाठक म्हणाले, माण तालुक्यात सरासरी पावसाचे प्रमाण साडेचारशे मिलीमीटर इतके आहे, प्रत्येक दहा वर्षाच्या कालावधीत सलग दोन ते चार वर्षे या भागात समाधानकारक पाऊसच पडत नसल्यामुळे येथील शेतकरी व सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाणी टंचाईसह दुष्काळाच्या संकटाचा सामना करावाच लागतो असा इतिहास गेल्या शंभर वर्षातील शासकीय अहवालात नमूद केलेल्या नोंदी वरुन निदर्शनास येतो.
या तालुक्यातील भौगोलिक व नैसर्गिक व पर्जन्यमानाचा इतिहास जरी शेतकरी बांधवांना शेतीसाठी आव्हानात्मक असा असला तरीही या तालुक्याती नैसर्गिक हवामान विशेषत: सर्व प्रकाळच्या द्राक्ष,ड्रग ड्रायफ्रूट या वेलवर्णीयसह आंबा,नारळ,चिक्कू,पेरु, सिताफळ,रामफळ,चिंच, आवळा,केळी,मोसंबी इत्यादी फळबागांसह कोकण पट्टीतील फणस,काजू व सिमला, जम्मू- काश्मिर भागातील सफरचंद फळबागचेही प्रयोग स्वरुपात लागवड केलेल्या फळबागेत यश मिळवित आहेत हि बाब कौतुकास्पद अशीच आहे.अनेक फळ बागांना येथील हवामानच अत्यंत पोषक असे आहे.शेतकरी बांधवांनी लागवड केलेल्या विविध फळबागांतून असल्याचे निदर्शनास आले
सन 2009 मध्ये आम्ही केसर जातीच्या तिनशे रोपांची लागवड केली होती. या फळबागेस शासनाच्या कृषि विभागाचेही वेळोवेळी प्रोत्साहनपर असे सहकार्य व मार्गदर्शन लाभले ठिबक सिंचन, शेततळेसाठी शासनाचे अनुदान मिळाले होते,गेल्या दोन वर्षापुर्वी सलग चार वर्षे समाधानकारक पाऊसच न झाल्यामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आले तरीही आम्ही टँकरने बागेस पाणी देऊन सर्व झाडे जिद्दीने जोपासली गेल्या वर्षी मात्र समाधानकारक पाऊस वेळेवर झाला व हवामानही पोषक असे टिकून राहिल्यामुळे झाडाची वाढ जलदगतीने झाली व योगायोगाने यावर्षी सर्व झाडे मोहरांनी बहरली सुमारे साठ टक्के प्रत्येक झाडास फळधारणा झाली व ती टिकूनही राहिली निसर्गाने साथ दिल्यामुळे बागेच्या संगोपनासाठी खुपच परिश्रम घेतले,वेळोवेळी कृषि विद्यापिठातील कृषि तज्ञांशी संपर्क साधून व शेतकरी मार्गदर्शपर शिबीरात उपस्थित राहिल्यामुळे फळ वाढीस व निर्यातक्षम फळासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषाचे पालन करुन बाग यशस्विरित्या जोपासण्यास यश मिळविले यामध्ये माझी पत्नी भाग्यश्री व बंधू प्रमोद यांचेही मोठे योग्यदान मिळाल्यामुळेच हे शक्य झाले.
सुमारे दहा टन उत्पादन मिळू शकल्यामुळे या विक्रीतून त्यांना सुमारे पंधरा लाख रुपये हाती येऊ शकतील व बाग संगोपनास सुमारे दोन लाख रुपये खर्च वजा जाता 13 लाखांचे उत्पन्न हाती येणार आहे.
अवर्षण प्रवण दुष्काळी माण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी प्रत्येक फळबागेस येथील पोषक हवामान व फळबागेस शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येत असलेल्या अनुदानासह बाग संगोपनाविषयी वेळोवेळी आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर कृषी तज्ज्ञांच्या शिबीराचा फायदा घेऊन शेतात पारंपरिक पिके घेण्या ऐवजी फळबाग लागवडीचा लाभ घेण्याचे आवाहन वेदपाठक यांनी केले आहे.
शक्यतो केसर हा आंबा इतर जातीच्या आंब्याच्या विक्रीचा सिझन संपल्यानंतर जून-जुलै महिन्यात परिपक्व होऊन बाजारपेठेत विक्रीस येतो. परिणामी, दर कमी मिळतो हा अनुभव पाहता आमच्या बागेतीलआंबा फळे मात्र सर्व प्रथम चालू एप्रिल महिन्यातच परिपूर्ण वाढ होऊन त्यास पाड लागल्यामुळे दुबई या परदेशी बाजारपेठेतील मागणी पाहता तेथे तो निर्यात होऊ शकला व बागेतच 140 ते 150 प्रति किलो असा विक्रमी दर मिळाल्यामुळे आर्थिक उत्पन्नात निश्चितच वाढ झाली.