आधुनिक काळात शिक्षणासोबतच शेतीचे महत्त्व सर्वांना समजले आहे. याचीच दखल आजचा तरुण घेत असल्याचे एक जिवंत उदाहरण माण तालुक्यातील वडगावच्या रानावर पाहायला मिळत आहे. सुमारे दहा एकर निव्वळ माळरानावर डोंगर हिरवागार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न बालाजी जगदाळे यांनी केला आहे. त्यांनी या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून 2700 झाडे लावली आहेत आणि ती पूर्णपणे जगवलेली सशक्तपणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
दहिवडी/कुकुडवाड : आधुनिक काळात शिक्षणासोबतच शेतीचे महत्त्व सर्वांना समजले आहे. याचीच दखल आजचा तरुण घेत असल्याचे एक जिवंत उदाहरण माण तालुक्यातील वडगावच्या रानावर पाहायला मिळत आहे. सुमारे दहा एकर निव्वळ माळरानावर डोंगर हिरवागार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न बालाजी जगदाळे यांनी केला आहे. त्यांनी या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून 2700 झाडे लावली आहेत आणि ती पूर्णपणे जगवलेली सशक्तपणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
मुख्यत: जगदाळे यांनी यासाठी पूर्णपणे ऑरगॅनिक पद्धतीचा वापर केला आहे. याच ठिकाणी ते देशी गाईंचे पालनपोषणही करत आहेत. आंब्याच्या बागेसाठी त्यांनी गाईंचे शेणखत, गोमुत्र, ताक, सोबतच दशपर्णी अर्क, नीम तेल, करंजी तेल आणि सर्व प्रकारच्या जिवाणूंचा ते वापर करतात. तसेच कोणताही रासायनिक खतांचा वापर करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यामध्ये आंब्याची 600 झाडांची वेगळी बाग आहे. तर लगतच वड, पिंपळ, चिंच, आंबा, भोकर, संत्री, चिक्कू, बोर, अंजीर, काजू, सीताफळ, हनुमान फळ, मसाल्याचे झाड, अशाप्रकारे सर्व जातींची कमी-जास्त मिळून 2700 झाडे यांनी पूर्ण ऑरगॅनिक पद्धतीने सांभाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंब्याच्या रोपांना शेणखत घालत असतानाच फक्त इतर मजुरांचा ते वापर करतात, अन्यथा झाडांना छाटणी आणि औषध फवारणीचे काम ते स्वत: करतात तसेच यासाठी त्यांनी ठिबकद्वारे कमी पाण्यात झाडे चांगली जोपासली आहेत. झाडांना औषध फवारणी महिन्यातून दोन वेळा करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ते आमवस्येच्या आदल्या दिवशी फवारणी करतात. कारण, या वेळी कोणतीही कीड अंडी घालते. त्यावेळीच औषध मारले तर ते कीड तयार होऊ देत नाही तर दुसरी फवारणी पौर्णिमेला घेतात. यातूनही काही किटाणू राहिले तर याचा नाश या वेळी होतो.
महिन्यातून फक्त चार तास वेळ आंब्याच्या बागेसाठी द्यावा लागतो. यंदा आंब्याला चांगला मोहर लागला आहे. आणि ते यावर्षी चांगले उत्पन्न घेतील, असा त्यांचा विश्वास आहे. येणार्या काळात कमीत कमी दहा लाख उत्पादन या फळबाग लागवडीतून मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. जगदाळे यांनी सकारात्मक दृष्टीने आपली वाटचाल केली असून, त्यांच्या आगळ्यावेगळ्या कष्टाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
भुसार शेतीकडे न वळता युवक शेतकर्यांनी फळबाग लागवडीकडे लक्ष देऊन आपला आर्थिक स्थर उंचवावा. त्यामधील बारकावे शिकून ऑरगॅनिक पद्धतीने शेती करावी, आपल्याला निश्चित यश मिळेल.
- बालाजी जगदाळे, युवा शेतकरी, वडगाव, ता. माण.