‘प्राज’च्या बायोसिरप तंत्रज्ञानाचे जयवंत शुगर्सवर ग्लोबल लॉन्चिंग उत्साहात
या नव्या तंत्रज्ञानामुळे वर्षभर ऊसाचा रस साठवून इथेनॉलची निर्मिती करणे शक्य
Published:Dec 06, 2021 09:05 AM | Updated:Dec 06, 2021 09:05 AM
News By : कराड | संदीप चेणगे
प्रयोगशील कारखान्यांत जयवंत शुगर्स महाराष्ट्रात एक नंबरला! प्राज इंडस्ट्रीजने साखर उद्योगासाठी अनेक नवनव्या तंत्रज्ञानाचे संशोधन केले आहे. या संस्थेने जयवंत शुगर्सच्या साथीने तयार केलेले बायोसिरप तंत्रज्ञान अव्वल दर्जाचे असून, प्रयोगशील कारखान्यांत जयवंत शुगर्स महाराष्ट्रात एक नंबरला आहे, असे गौरवोद्गार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.
साखरेच्या हंगामाशिवाय इतरवेळी वर्षभर इथेनॉल उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘बायोसिरप’ या नव्या शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती पुणे येथील प्राज इंडस्ट्रीजने केली आहे. जागतिक स्तरावर पहिल्यांदाच बनलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचे ग्लोबल लॉन्चिंग धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सच्या कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, भारत सरकारच्या मुख्य साखर संचालक संगीत सिंगला, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, संचालक तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. बबनराव शिंदे, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी, जयवंत शुगर्सचे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आदी मान्यवर होते. याप्रसंगी बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, की सन २००३ साली केंद्र सरकारने इथेनॉल पॉलिसी आणली. बायोसिरप या तंत्रज्ञानामुळे साखर उद्योग पूर्ण वर्षभर चालणार असल्याने, त्याचा फायदा ऊस उत्पादकांना नक्कीच होईल. जगाला पर्यायी इंधनाची मोठी गरज असून, ऊसाचे पीक संपणार असल्याने, या नव्या तंत्रज्ञानामुळे साखर उद्योगालाही चांगले दिवस येतील. साखर आयुक्त श्री. गायकवाड म्हणाले, की महाराष्ट्रात साखर उद्योगांनी समृद्धी आणली. पण आता साखरेचा वापर कमी होऊ लागल्याने त्याचा साखर उद्योगावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आता साखरेऐवजी पर्यायी उत्पादनांचा विचार व्हायला पाहिजे. ना. नितीन गडकरी यांनी इथेनॉल निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न केला असून, गेल्यावर्षी महाराष्ट्रात ८५ कोटी लिटर इथेनॉल बनविण्यात आले. यावर्षी त्यामध्ये आणखी ४० कोटी लिटर वाढविण्याचा विचार आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांपेक्षा इथेनॉलवरील वाहनेच जास्त पर्यावरणपूरक आहेत, असा सूर जगभरात उमटत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी बायोसिरप या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत, इथेनॉल निर्मितीला चालना द्यावी. जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी बाजारपेठेतील साखरेच्या दरातील चढउतार ही संपूर्ण जगभर भेडसावणारी समस्या आहे. अशावेळी साखर कारखान्यांनी साखरेऐवजी उपपदार्थाच्या निर्मितीकडे वळायला हवे. इथेनॉल निर्मितीबाबत ना. गडकरीसाहेब महत्वाकांक्षी असून, येत्या काळात पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलला महत्व येणार आहे. अशावेळी बायोसिरप तंत्रज्ञान ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. ‘प्राज’चे संस्थापक श्री. चौधरी म्हणाले, ग्रामीण अर्थकारणाला बळ देण्यासाठी प्राज इंडस्ट्रीज नेहमीच प्रयत्नशील राहिली असून, विविध प्रकारच्या बायोप्रॉडक्टच्या उत्पादनांसाठी आग्रही राहिली आहे. साखर उद्योगात वर्षातील ठराविक काळातच कारखान्यांचा हंगाम राबविला जातो. अशावेळी उर्वरित वर्षात इथेनॉल निर्मिती करायची झाल्यास हंगाम संपल्याने व ऊसाची उपलब्धता न झाल्याने अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणून साखरेच्या हंगामाशिवाय इतरवेळी वर्षभर इथेनॉल उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘बायोसिरप’ या नव्या शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती आम्ही केली आहे. या नव्या ‘बायोसिरप’ तंत्रज्ञानामुळे आता वर्षभर ऊसाचा रस साठवणे शक्य होणार असून, साखर हंगामाच्या पलीकडे वर्षभर इथेनॉलची निर्मिती करणे शक्य होणार आहे. यावेळी ‘प्राज’चे अतुल मुळे आणि वसंतदादा शुगर्स इन्स्टिट्यूटचे एस. व्ही. पाटील यांनी बायोसिरप तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. तसेच रेणुका शुगर्सचे प्रेसिडेंट रवी गुप्ता यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गुरूदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, कार्यकारी संचालक राहुल घाटगे, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, श्री. विनायक भोसले यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, प्रकाश नाईकनवरे, विद्याधर अनासकर यांच्यासह विविध साखर कारखान्याचे संचालक, अधिकारी व तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट चारुदत्त देशपांडे यांनी स्वागत व आभार मानले.