ट्रकच्या धडकेत दोनजण जागीच ठार
कराड कोल्हापूर नाक्यावरील घटना ः घटनास्थळी बघ्याची गर्दी
Published:Dec 20, 2020 10:54 AM | Updated:Dec 20, 2020 10:54 AM
News By : Muktagiri Web Team
कराड ः येथील कोल्हापूर नाक्यावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर दुचाकीवरून एक पुरूष व एक महिला निघाली होती. रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. घटना घडताच घटनास्थळावरून ट्रकचालकाने पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून ट्रकसह चालकाला पोलीस ठाण्यात आणले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी बघ्यांची खूप मोठी गर्दी झाली होती.