साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम द्यावी अन्यथा 28 फेब्रुवारीपासून आंदोलन
News By : Muktagiri Web Team
‘साखर कारखान्यांच्या माध्यमातून सत्तेची फळे चाखणारे शेतकर्यांच्या एफआरपीबद्दल मूग गिळून बसले आहेत. वर्षभर घाम गाळणार्या शेतकर्यांना कायम कर्जबाजारी ठेवून, साखर कारखानदार राजकारणाची पोळी भाजत आहेत, त्यांना शेतकर्यांच्या हक्काची एफआरपी रक्कम द्यावीच लागेल, अन्यथा 28 फेब्रुवारीपासून साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन छेडले
कुमठे : ‘साखर कारखान्यांच्या माध्यमातून सत्तेची फळे चाखणारे शेतकर्यांच्या एफआरपीबद्दल मूग गिळून बसले आहेत. वर्षभर घाम गाळणार्या शेतकर्यांना कायम कर्जबाजारी ठेवून, साखर कारखानदार राजकारणाची पोळी भाजत आहेत, त्यांना शेतकर्यांच्या हक्काची एफआरपी रक्कम द्यावीच लागेल, अन्यथा 28 फेब्रुवारीपासून साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल,’ असा इशारा माजी मंत्री व रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांनी दिला.
जळगाव (ता. कोरेगाव) येथे संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा रविवारी रात्री झाला. त्यावेळी साखर कारखानदारांवर तोफ डागताना आ. खोत बोलत होते.
व्यासपीठावर संघटनेचे पदाधिकारी विनायक पाटील, सचिन नलावडे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. खोत म्हणाले, ‘स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजविण्याचे काम केले. मात्र, त्यांचे वारसदार होऊ पाहणार्या खा. शरद पवार यांनी हीच चळवळ पाडण्याचे काम केले आहे. साखर कारखाने तोट्यात दाखवायचे, बंद पाडायचे आणि पुन्हा लिलावात घेऊन खासगी करायचे, असे त्यांचे धोरण राहिले आहे. कोरेगावच्या कारखान्याचे उदाहरण घ्या, संपूर्ण कार्यक्षेत्र हे बैलगाडीतून ऊस वाहतुकीसाठी योग्य असताना, कारखाना अडचणीत आणला शे चारशे-पाचशे कोटीचा कारखाना पन्नास कोटीत घशात घातला, आता तो चांगला कसा काय चालला आहे,’ असा सवाल त्यांनी केला. खा. पवार हे हुशार आहेत, पण हुशारी ते शेतकर्यांसाठी वापरत नाहीत, याचे मोठे दु:ख आहे.
शेतकर्यांच्या घामाच्या पैशातून सहकारी साखर कारखान्यांची उभारणी झाली आहे, पूर्वी शेतकरी शेअर्स सर्टिफिकेट आनंदाने घरात दर्शनी भागात लावायचे, आता त्यांचा काही उपयोग होत नाही. कारखान्यांच्या माध्यमातून सत्ता उपभोगायची, पुन्हा-पुन्हा सत्ता मागायची आणि सेवा करायची संधी द्या, असे म्हणायचे, हा सगळा धंदा सुरू आहे. कोरोना काळात सर्व व्यवहार बंद असताना आमचा बळीराजा अहोरात्र काम करत होता, जनावरे सांभाळत होता, सर्वसामान्यांना अन्नधान्य आणि भाजीपाला पुरवत होता, अशा शेतकर्यांच्या जीवावर मोठे झालेल्या साखर कारखानदारांनी एफआरपी विषयी शेतकर्यांचा अजिबात अंत पाहू नये. 28 फेब्रुवारीपासून सहकारी साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले जाणार असून, हे आंदोलन व्यापक स्वरूपात राहील, पत्रीसरकारच्या सातारा जिल्ह्यातून आंदोलनाचे रणशिंग फुंकले जात असून, त्याचा भडका संपूर्ण राज्यात उडल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा आ. खोत यांनी दिला.
सातारा जिल्ह्यात सहकार मंत्रिपद आहे, मंत्रिमहोदयांनी स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. वसंतदादा पाटील यांनी रुजवलेल्या सहकार चळवळीला अभिप्रेत असे काम करणे गरजेचे आहे. त्यांनी शेतकर्यांचे हित पाहून साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कम अदा करण्याचे आदेश देणे गरजेचे होते, मात्र ते तसे करत नाहीत, त्यामुळे वेळप्रसंगी त्यांचा राजीनामा मागण्याची वेळ आली तरी, तो ही मागू, असा इशारा आ. खोत यांनी दिला. राज्यातील शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचे काम खा. शरद पवार यांनी केल्याची टीका करत त्यांनी पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या.
राज्यात भाजपचे सरकार असताना मी कृषी व पणनमंत्री होतो, मी भाजीपाला नियमन रद्दबातल केले, त्याच्या विरोधात बाजार समित्यांनी संप पुकारला, मी बाजार समित्या बरखास्त करून प्रशासक नेमतो, असा इशारा देताच, बाजार समित्यांनी अक्षरश: माघार घेतली. दुग्धव्यवसाय खुला केल्यावर आज वाडीवस्तीवर दूध डेअरी झाल्या, दुग्धव्यवसाय करणार्यांना आता चांगला दर मिळू लागला आहे, अगदी त्याच धर्तीवर केंद्र सरकारने कृषी कायदे केले असून, त्याची अंमलबजावणी केल्याने शेतकर्यांना फायदा होणार आहे. देशात 70 वर्षे काँग्रेस सरकारचे कृषी कायदे लागू होते, त्याचा सर्वाधिक तोटा शेतकर्यांना तर सर्वाधिक फायदा राजकीय पुढार्यांना होत होता. आता 7 वर्षे आमच्या सरकारचे कायदे राबवून पाहू या, मग कळेल कोणाचे बरोबर आहे ते, असेही आ. खोत यांनी विविध उदाहरण देत स्पष्ट केले.
प्रारंभी विनायक पाटील, सचिन नलावडे, सचिन जाधव व मधुकर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
...त्यांना सळो की पळो करून सोडणार
आ. सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणात आपण हाडाचे शेतकरी व कार्यकर्ता असल्याचे दाखवून दिले. त्यांनी सध्याच्या सत्ताधार्यांवर टीका करत साखर कारखान्यांच्या चेअरमनबरोबरच संचालकांच्या घरासमोर आंदोलन करा, असा सल्ला दिला. सुरुवातीला कारखान्यावर, मग चेअरमनच्या घरासमोर आणि त्यानंतर सुद्धा एफआरपीची रक्कम मिळाली नाही तर संचालकांच्या घरासमोर मुक्काम करत भाकर खा आणि आंदोलन करा, संचालक प्रतिष्ठेपायी गपगुमान एफआरपी देण्यासाठी चेअरमनवर दबाब आणेल, मग एफआरपीची रक्कम कशी मिळत नाही, हेच बघतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यातून आंदोलनाची सुरुवात करत असून, आंदोलनाचा वणवा संपूर्ण राज्यात पेटेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.