कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांची मोठी आबाळ होत असतानाच खटाव तालुक्यातील बोंबाळे (भाग्यनगर) येथील युवकांनी गावातच दहा बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करत माणुसकीचे पाऊल पुढे टाकले आहे.
कातरखटाव : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांची मोठी आबाळ होत असतानाच खटाव तालुक्यातील बोंबाळे (भाग्यनगर) येथील युवकांनी गावातच दहा बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करत माणुसकीचे पाऊल पुढे टाकले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोनाने खटाव तालुक्यात ही आपला चांगलाच जम बसविला असून, अनेक गावे हॉटस्पॉट ठरत आहेत. यापैकीच बोंबाळे (भाग्यनगर) हे एक हॉटस्पॉट असून सुमारे सत्तर पेक्षा अधिक बाधित रुग्ण गावात आहेत. यामध्ये वयोवृद्ध व तरुणांची संख्या जास्त आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ही रात्रीचा दिवस करत आहे. मात्र, बाधितांची संख्या कमी व्हायचे नाव घेत नाही. यामुळे ग्रामस्थ भयभीत व चिंताग्रस्त झाले आहेत.
अशा परिस्थितीत सरपंच रेश्मा निंबाळकर, उपसरपंच बालाजी निंबाळकर, गणेश निंबाळकर, गोरख निंबाळकर, महेश निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, प्रशांत निंबाळकर, दत्तात्रय घोरपडे अभय शिंदे, प्रदीप निंबाळकर आदींनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने प्राथमिक शाळेत दहा बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.
त्यानुसार शाळेच्या संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून शाळेच्या दोन खोल्या ताब्यात घेतल्या. यामध्ये दहा बेडचे नियोजन करत महिला रुग्णांसाठी एक तर पुरुष रुग्णांना एक खोली असे नियोजन करत ज्या बाधित कुटुंबातील रुग्णांना आपल्या घरी विलगीकरणाची सोय नाही, अशा वयोवृद्ध लोकांना या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी आवश्यक असणार्या पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने टँकरद्वारे करण्यात येणार असून, विलगीकरणातील रुग्णांच्या कुटुंबातील नातेवाइकांनी संबंधितास जेवणाचा डबा पोहोच करण्याचा निर्णय घेण्यात आला.
येथील आरोग्य उपकेंद्रतील डॉ. मनोज निंबाळकर, डॉ. लिना गुरव, आरोग्यसेविका धोंडुबाई गोसावी, आशा स्वयंसेविका अर्चना नलवडे, नलिनी नलवडे यांच्याकडे या रुग्णांची देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
गावात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोणी कोणाची काळजी घ्यावी हेच समजेनासे झाले आहे. त्यामुळे गावानेच गावकर्यांची काळजी घेतली पाहिजे, या उदात्त हेतूने गावातच विलगीकरण कक्ष असावे, असा निर्णय घेत पूर्णत्वास नेला. याचे आपणास समाधान आहे.
- दत्तात्रय घोरपडे, माजी ग्रा. पं. सदस्य.