कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षित कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे रखडली आहेत. नगरपंचायत विविध थातूर मातूर कारणे देऊन लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, त्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. 1 मे 2021 रोजी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्राच्या दिनाच्या ध्वजारोहणावेळी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
कुमठे : कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षित कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे रखडली आहेत. नगरपंचायत विविध थातूर मातूर कारणे देऊन लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, त्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. 1 मे 2021 रोजी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्राच्या दिनाच्या ध्वजारोहणावेळी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, नगरपालिका प्रशासन विभागाचे प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांना शहरातील लाभार्थ्यांनी निवेदन दिले असून, त्यामध्ये धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरेगाव नगरपंचायतीमार्फत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आलेली असून, त्यासाठी स्वतंत्र स्थापत्य अभियंत्याची नेमणूक देखील करण्यात आलेली होती. योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवसापासून नगरपंचायतीमध्ये अनागोंदी सुरू असून, या विभागासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्यांची भाषाशैली अत्यंत वाईट आहे. लाभार्थ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही, अभियंता काम सोडून गेला आहे, त्याच्याकडे कपाटाच्या चाव्या आहेत, शासनाकडून निधी आला नाही, असे सांगत लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
पंतप्रधान आवास योजना ही केंद्र आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात आहे. या योजनेच्या यशस्वितेसाठी नगरपंचायतीस कोणतेही सुख अथवा दु:ख नाही. अनेक दिवसांपासून स्थापत्य अभियंत्याचे पद रिक्त आहे. त्याबाबत विचारणा केल्यावर सुद्धा पदाधिकारी अथवा अधिकारी-कर्मचारी व्यवस्थित माहिती देत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. या संदर्भात नगरपालिका प्रशासन विभागाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी सचिन पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात आलेली होती. मात्र, त्यांनी मुख्याधिकार्यांना तोंडी सूचना देण्यापलीकडे काहीच केले नाही.
नगरपंचायतीमध्ये पूनम कदम, प्रमोद सव्वाखंडे, गोसावी, अशोक कुंभार, विनायक औंधकर यांच्यासह कपिल जगताप या मुख्याधिकार्यांच्या कार्यकालामध्ये या योजनेस अपेक्षित गती मिळालेली नाही. तब्बल सहा मुख्याधिकारी बदलून गेले तरी योजना मूर्त स्वरूप घेऊ शकलेली नाही. सध्याच्या मुख्याधिकारी विजया घाडगे या योजनेसाठी म्हणाव्या अशा आग्रही नाहीत. त्यांना वारंवार भेटून देखील, त्या दखल घेत नाहीत. या संदर्भात आ. शशिकांत शिंदे व आ. महेश शिंदे यांनी देखील सूचना केल्या आहेत, मात्र नगरपंचायत प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही.
एकंदरीत नगरपंचायतीला लाभार्थ्यांना लाभ द्यायचा नाही, असे चित्र आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी हे दि. 1 मे 2021 रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्रीय ध्वजारोहणावेळी धरणे आंदोलन छेडणार आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
या निवेदनावर पोपट येवले, विलास सरगडे, चैताली भोसले, शशिकांत जाधव, शकुंतला जाधव, उषा बर्गे, मनोहर राऊत, संजय पवार, प्रशांत गुरव, सचिन गुरव, गजानन बारटक्के, राजेंद्र बारटक्के, लक्ष्मी पवार, वाजीद मणेर, शंकर बोतालजी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांना सादर करण्यात आलेल्या आहेत.