‘मायणी येथे असणार्या ब्रिटिशकालीन तलावावर परदेशी फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्याने मायणीसह कानकात्रे, येरळवाडी, सूर्याचीवाडी तलाव क्षेत्रात लवकरच पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा प्राप्त होणार आहे,’ अशी माहिती मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिली.
मायणी : ‘मायणी येथे असणार्या ब्रिटिशकालीन तलावावर परदेशी फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्याने मायणीसह कानकात्रे, येरळवाडी, सूर्याचीवाडी तलाव क्षेत्रात लवकरच पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा प्राप्त होणार आहे,’ अशी माहिती मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिली.
मायणी पक्षी आश्रयस्थान येथे यासंबंधात आयोजित बैठक प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, कोल्हापूर विभागीय वनाधिकारी गवते यांची प्रमुख उपस्थिती होती.
मायणी येथे ब्रिटिशकालीन तलाव असून, 1896च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या देखरेखीखाली या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. या तलावातील पाणीसाठ्यामुळे व बाजूच्या वनसंपदेमुळे इथे प्लेमिंगोसह बरेच पक्षी आश्रयासाठी येतात. त्यांचे संरक्षण व संवर्धन होण्याच्या दृष्टीने सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांच्या प्रयत्नाने प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार मायणी पक्षी आश्रयस्थान शाश्वत विकास साधून पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने मायणी येथील ग्रामस्थ व पक्षीप्रेमी नागरिक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी परिसरातील नागरिक व पक्षी प्रेमी उपस्थित होते.
याविषयी त्यानुसार सदर प्रस्ताव शासनाकडून लवकरच मंजूर होऊन मायणी येथील पक्षी आश्रयस्थानाचा विकास करण्यात येणार असल्याचे बेल यांनी स्पष्ट केले, याविषयी ग्रामस्थांचे उद्बोधन करून हक्क सुरक्षित ठेवण्याबाबत सांगण्यात आले.
यावेळी डॉ. श्यामसुंदर मिरजकर, माजी उपसरपंच सूरज पाटील, पोपट मिंड, बाळासाहेब कांबळे, अंकुश चव्हाण, राजाराम कचरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
येथील ब्रिटिशकालीन तलाव परिसरातील जुन्या बागेची झालेली पडझड पाहून या बागेस उजाळा देण्यासाठी मायणीतील युवक पत्रकार दत्ता कोळी व सागर घाडगे यांनी वनविभागाची रीतसर परवानगी घेऊन बागेच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले. त्यांच्या या सामाजिक कार्यात माण तालुक्यातील रोहित बनसोडे, शंकर बनसोडे यांनी तर मायणीतील राज सामाजिक संस्था, शिवनेरी ग्रुप, जगदंब ग्रुप, सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप, विनायक दुर्गामाता ग्रुप, मानवाधिकार संघटना, भूमाता ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, वजीर ग्रुप यांनीही सहभाग नोंदवला.
सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीत याठिकाणची जुनी बाग सुंदररीत्या स्वच्छ होऊन या परिसराला गतवैभव मिळाले. यापूर्वी मायणी येथील फ्रेंड्स ग्रुपने या तलावातील पाण्याची गळती थांबवणे, बीज गोळे तयार करून नवीन झाडांची निर्मिती करणे, असे काम करून या परिसराचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.
आज कोल्हापूर प्रादेशिक वनविभागचे प्रमुख डॉ. व्ही. क्लेमेंट बेन (मुख्य वनसंरक्षक), सातारा उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंग हाडा यांच्यासह अन्य प्रमुख अधिकार्यांनी मायणी पक्षी आश्रयस्थान याठिकाणी भेट देऊन स्थानिक युवक व नागरिकांच्या केलेल्या कामाचे कौतुक करीत, हा सर्व परिसर आणखी निसर्गरम्य करण्याकामी यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य रणजित माने, सातार्याचे सहायक उपवनसंरक्षक संजीवन चव्हाण, वडूजच्या वनक्षेत्रपाल शीतल फुंदे, मायणीचे वनपाल काश्मीर शिंदे, मायणीच्या वनरक्षक संजीवनी खाडे, कलेढोणचे वनरक्षक मुंडे, पाचवडचे वनरक्षक प्रकाश पारधी, संजय गुदगे, प्रा. विकास कांबळे, मिलिंद देशमुखे, श्रीकांत सुरमूख, सागर माळी, सूरज माळी व ग्रामस्थ उपस्थित होते.